इफकोच्या खतांची अनधिकृत विक्री, कारवाईचा बडगा
By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 09:55 IST2025-03-12T09:55:06+5:302025-03-12T09:55:18+5:30
केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशाप्रमाणे विहित ‘ओ’ प्रमाणपत्रधारकांनाच अशी खते विकता येतात. मात्र,

इफकोच्या खतांची अनधिकृत विक्री, कारवाईचा बडगा
पुणे : इफकोने अधिकृत न केलेल्या तसेच केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशामध्ये अंतर्भूत नसलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममार्फत इफकोच्या नॅनो खतांची बेकायदेशीरपणे व अधिकृत दरापेक्षा कमी दराने विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची व विक्रेत्याची दिशाभूल होत असून, अशा ऑनलाइन विक्री करणाऱ्यांविरुद्ध इफकोमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशाप्रमाणे विहित ‘ओ’ प्रमाणपत्रधारकांनाच अशी खते विकता येतात. मात्र, तरीही काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म असे कोणतेही प्रमाणपत्र नसताना व इफकोने प्राधिकृत केलेले नसतानाही अत्यल्प साठा अवास्तव दरात विक्री करून ऑनलाइन ग्राहक आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. हे बेकायदेशीर असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच इफकोच्या खतांची खरेदी करावी, असे आवाहन इफकोच्या वतीने करण्यात आले आहे.
इफकोचे नॅनो खतांचे दर देशभर समान आहेत. तरी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करावेत, असे आवाहन इफकोने केले असून अनधिकृत व बेकायदेशीर पद्धतीने खतांची अवास्तव किमतीत विक्री करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म विरोधात इफकोने आता कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला आहे. इफकोच्या खतांच्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये व विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास तो व्यावसायिक हितास हानीकारक असल्याचे गृहीत धरून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
नॅनो खतांचे निश्चित दर (जीएसटीसह)
नॅनो युरिया : विक्रेत्यास विक्री दर - २०४ रुपये प्रति ५०० मिली
शेतकऱ्यांसाठी विक्रीदर जास्तीत जास्त - २२५ प्रति ५०० मिली
नॅनो डीएपी : विक्रेत्यास विक्री दर - ५४७.५० प्रति ५०० मिली
शेतकऱ्यांठी जास्तीत जास्त दर - ६०० प्रति ५०० मिली