जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द, अपघातांचे ४२ ब्लॅक स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 22:30 IST2026-02-13T22:25:54+5:302026-02-13T22:30:02+5:30
वाहतूक नियम मोडणाऱ्या आतापर्यंत सुमारे तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द, अपघातांचे ४२ ब्लॅक स्पॉट
पुणे : जिल्ह्यात वर्षभरात ९०० पेक्षा अधिक अपघाती मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने ब्लॅक स्पॉटचे सखोल सर्वेक्षण करून तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, ४२ ब्लॅक स्पॉट होते, त्यातील १५ ब्लॅक स्पॉट काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, अनधिकृत होर्डिंग हटविणे यासह घाट मार्गांवर लेन ओलांडण्यास प्रतिबंध घालण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. वाहतूक नियम मोडणाऱ्या आतापर्यंत सुमारे तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे राहुल जाधव, बारामतीचे सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण पूर्ण केले असून ४२ ब्लॅक स्पॉट होते त्यातील १५ ब्लॅक स्पॉट काढण्याचे काम सुरू आहे. उर्वरित ब्लॅक स्पॉट काढण्याची संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. हिंजेवाडी व चाकण परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यातील एमएसआरडीसी, एनएचआय व सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करावी. संबंधितांना २१ दिवसांची नोटीस देऊन त्यानंतर उर्वरित होर्डिंग काढून टाकावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शक्यतोवर मुख्य रस्त्यावर गतिरोधक उभारू नयेत, धोकादायक जंक्शन असल्यास अप्रोच/दुय्यम रस्त्यावर इंडियन रोड काँग्रेस प्रमाणे गतिरोधक व चिन्हांकन करावे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या धर्तीवर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे स्मूथ गतिरोधक असावेत.
सोमवारी पाहणी
नवले ब्रिज परिसरातील अपघात कमी करण्यासाठी समितीमार्फत आयआयटी दिल्लीचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यानुसार आयआयटीचे पथक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस विभाग, महानगरपालिकांचे अधिकारी मिळून सोमवारी (दि. १६) भेट देऊन पाहणी करावी, असे आवाहन डुडी यांनी केले.