पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आमदार हेमंत रासने यांनी भेट घेतली. या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणीही रासनेे यांनी केली आहे.ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल. या प्रस्तावास गती देण्यासाठी हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे. तसेच, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा शब्द दिल्याची माहिती रासने यांनी दिली आहे. खडक येथील रखडलेल्या मामलेदार कचेरीच्या बांधकामाला गती देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.पोलिस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी कराराज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची देखील अधिवेशना दरम्यान भेट घेऊन खडकमाळ येथील पोलिस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे.