पुणे : काेराेना रुग्ण सक्रियतेच्या संख्येबाबत पुणे राज्यात नेहमीच ‘टाॅप’ राहिले आहे. आताही तीच स्थिती आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण मिळून सध्या ४६० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई (४०३), तर तिसऱ्या क्रमांकावर ठाणे (३११) आहे. दिलासादायक म्हणजे पाच जिल्ह्यांमध्ये काेराेना रुग्णसंख्या शून्य आहे.
काेराेना रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. रुग्णवाढीचा जाे दर एकाच्या आत हाेता, ताे आता तीन टक्क्यांवर आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी याबाबत सर्व राज्यांनी काळजी घ्यावे, असे आवाहन केले आहे. सध्या एक्सबीबी १.१६. हा ओमिक्राॅनचा उपप्रकार सध्या काेराेनाच्या वाढत्या साथीला कारणीभूत ठरत आहेत.
स्वाईन फ्लू असाे की काेराेना किंवा इन्फ्लूएंझा पुणे हे या साथीच्या आजारांसाठी नेहमीच हाॅटस्पाॅट ठरले आहे. रुग्णांची वाढती संख्या त्याचबराेबर येथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हाेणारे तत्परतेने निदान, प्रयाेगशाळांची वाढलेली संख्या, एनआयव्ही यामुळे ही संख्या वाढलेली नेहमीच दिसून येते. काेराेना काळात याचा अनुभव आलेला आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत तर पुणे जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या ही देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक नाेंदविली गेली. साेबत या साथीच्या आजारांसाठी येथील वातावरणही पाेषक असल्याने ही संख्या दिसून येते.
सध्या पुणे जिल्ह्यात काेराेनाचे ४६० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तसेच ९ मार्च २०२० पासून आतापर्यंत १५ लाख ६ हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर, २० हजार ६०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठाेपाठ मुंबई, ठाणे या जिल्ह्यांचा नंबर लागताे.
स्वाईन फ्लूचे ४२५ रुग्ण
काेराेना पाठाेपाठ आता एच३ एन२ या रुग्णांची संख्याही जानेवारीपासून वाढत आहे. सध्या राज्यात एच३ एन२ चे २६४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १६२ रुग्ण हाॅस्पिटलमध्ये दाखल आहेत. एच१ एन१ म्हणजे स्वाईन फ्लू चे ४२५ रुग्ण आढळून आले आहेत.
काेराेना आकडेवारी :
जिल्हा सक्रिय काेराेना रुग्ण
पुणे ४६०
मुंबई ४०३
ठाणे ३११
पुण्यातील रुग्णांची आकडेवारी :
- आतापर्यंत पाॅझिटिव्ह आढळलेले रुग्ण : १५ लाख ६ हजार
- मृत्यू : २० हजार ६०८
पुणे शहरात काेराेना रुग्णसंख्या आटाेक्यात आहे. महापालिकेकडून याेग्य त्या उपाययाेजना करण्यात येत आहेत. काेराेनाच्या रुग्णसंख्येबराेबरच एच३एन२च्या रुग्णसंख्येवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.
- डाॅ. सूर्यकांत देवकर, साथराेग अधिकारी, पुणे मनपा