जिल्ह्यातील तीन हजार जलस्रोतांची तपासणी, १३८ ठिकाणी अशुद्ध पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:03 IST2025-05-14T09:02:57+5:302025-05-14T09:03:52+5:30
पुणे जिल्ह्यातील तीन हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३८ ठिकाणचे नमुने दूषित आले आहे.

जिल्ह्यातील तीन हजार जलस्रोतांची तपासणी, १३८ ठिकाणी अशुद्ध पाणी
पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने गावागावांतील जलस्रोतांची तपासणी करण्यात येत असते. यामध्ये किती स्रोत तीव्र जोखमीचे, मध्यम जोखमीचे आणि सौम्य जोखमीचे आहेत त्यावर त्यांना कार्ड दिले जाते. त्या कार्डनुसार उपाययोजना करणे बंधनकारक असते. पावसाळ्याच्या आधी तर प्राधान्याने ही तपासणी केली जात असून, पुणे जिल्ह्यातील तीन हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३८ ठिकाणचे नमुने दूषित आले आहे.
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात वाहून आलेले पाणी, सांडपाणी मिसळण्याची शक्यता असल्याने अतिसार, हगवण, कॉलरा, विषमज्वर म्हणजेच टायफॉइड, कावीळ यासारखे जलजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तसेच प्रत्येक तीन महिन्यांनंतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येते. एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यातील १३ तालुक्यांत एक हजार ३८५ महसुली गावांतील तीन हजार ४०५ जलस्रोतांच्या तपासणीनंतर १३८ ठिकाणचे नमुने दूषित आढळले. यामध्ये जुन्नर तालुक्यात सर्वाधिक दूषित जलस्रोत आढळले. त्या पाठोपाठ शिरूर, आंबेगाव आणि बारामती तालुक्याचा नंबर लागतो.
...तर मिळते रेड कार्ड
ज्या गावातील पिण्याचे पाणी ७० टक्क्यांपेक्षाही अधिक पिण्याला योग्य नसते म्हणजेच ते तीव्र जोखमीचे असते, अशा गावांना रेड कार्ड दिले जाते. तीन वर्षांत ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेमुळे मृत्यू झाला असल्यास अशा गावांचा यामध्ये समावेश असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी हे कार्ड देतात. जेणेकरून या ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने करता येतील. पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता देतात. हिरवे कार्ड त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी देतात.
कोणत्या कार्डचा काय अर्थ?
रेड कार्ड : तीव्र जोखीम. पिण्याचे पाणी ७० टक्क्यांपेक्षा अधिक अशुद्ध असणे.
पिवळे कार्ड : मध्यम जोखीम. पिण्याचे पाणी ३० ते ७० टक्के अशुद्ध असणे.
हिरवे कार्ड : सौम्य जोखीम. पिण्याचे पाणी १ ते ३० टक्के अशुद्ध असणे.
तीन गावांमध्ये सर्वाधिक जलस्रोत दूषित
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका गावामध्ये सर्वाधिक जलस्रोत दूषित आढळले आहेत. यामध्ये जुन्नरमधील गोंद्रे येथे पाच, आंबेगावमधील घोडेगाव चार, तर पुरंदरमधील केतकावळे येथे ४ जलस्रोत दूषित आढळले आहेत.
वेल्हेत शुद्ध पाणी
वेल्हे तालुक्यातील ९२ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे यामध्ये एकही जलस्रोत दूषित निघाला नाही. त्यामुळे वेल्हेकरांना शुद्ध पाणी मिळत आहे. या खालोखाल मुळशी तालुक्यात केवळ दोन ठिकाणीच दूषित पाणी आढळले आहे. मुळशीतून ११२ नमुने घेण्यात आले होते.
तालुकानिहाय दूषित जलस्रोतांची संख्या
तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने
आंबेगाव ३५७ २०
बारामती ३६४ १५
भोर २३० ६
दौंड १९८ ७
हवेली १४७ ६
इंदापूर २४१ ८
जुन्नर ४५५ २७
खेड ३३२ ६
मावळ १७२ ६
मुळशी ११२ २
पुरंदर २७७ ९
शिरूर २९० २६
वेल्हा ९२ ०
एकूण ३४०५ १३८