भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हेच खऱ्या कलाकाराचे एकमेव उद्दिष्ट - ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:13 IST2025-04-08T12:10:53+5:302025-04-08T12:13:10+5:30

भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 'रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज' तर्फे विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन

pune The only goal of a true artist is to convey the role to the audience Veteran actor Ravindra Mankani | भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हेच खऱ्या कलाकाराचे एकमेव उद्दिष्ट - ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी

भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हेच खऱ्या कलाकाराचे एकमेव उद्दिष्ट - ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी

पुणे : मला मिळत गेलेल्या भूमिकांमध्ये सातत्याने नावीन्याचा शोध घेत राहिलो. त्या भूमिकेच्या सादरीकरणात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत ती भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत राहिलो. कोणत्याही कलाकारास त्याची सर्वोत्तम भूमिका कोणती असे विचारल्यास त्याचे उत्तर देणे अवघड असते. कारण शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आपली भूमिका पोहोचविणे हे खऱ्या कलाकाराचे एकमेव उद्दिष्ट असते, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे शनिवारपासून (दि. ५ ते १९ एप्रिल) या कालावधीत आयोजित विश्व मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा, सी.ए. प्रमोद जोशी, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे, विश्व मराठी एकांकिका स्पर्धचे संयोजक अविनाश ओगले आणि लीना गोगटे उपस्थित होते. यावेळी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे आजही कार्यरत असल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. न्यूझीलंडमधील ‘खेळ’ आणि सिडनीमधील ‘आपला तो बाब्या’ या दोन एकाकिकांच्या सादरीकरणाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले. लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी संयोजक लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांनी रवींद्र मंकणी यांच्याशी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधला.

रवींद्र मंकणी म्हणाले की, सीओईपीसारख्या नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या मला अभिनयाने खेचून घेतले. यामागे शालेय जीवनात मी करीत असलेल्या भूमिकांना शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन हे एक कारण होते. घरातही साहित्य, संस्कृती आणि कलेचे वातावरण असल्याने तसेच आई-वडीलही अभिनय क्षेत्रात असल्याने बालवयात माझ्यावर नाट्यसंस्कार झाले. मी मला मिळत गेलेल्या भूमिकांमध्ये सातत्याने नावीन्याचा शोध घेत राहिलो.

रसिकांच्या मनात त्या कलाकाराच्या एखाद्या भूमिकेने घर केलेले असेल म्हणून त्याची ती भूमिका सर्वोत्तम म्हणून त्या कलाकारालाही आवडली असेल, असे नाही.

वझे म्हणाले, प्रेक्षकांसमोर नाट्यकर्मी आणि नाट्यकर्मींसमोर प्रेक्षक असल्याशिवाय नाटक होऊ शकत नाही. या मतावर मी आजही ठाम असलो तरी, काळाची पावले ओळखत नाटक जिवंत राहण्यासाठी जे-जे मार्ग अवलंबता येतील ते ते मार्ग अवलंबले पाहिजे. या प्रसंगी शीतल शहा म्हणाले, अशा सांस्कृतिक उपक्रमातून भाषा आणि कला जागृत ठेवण्यासाठी रोटरी क्लब कायम सगळ्यांच्या मागे उभी राहील.

Web Title: pune The only goal of a true artist is to convey the role to the audience Veteran actor Ravindra Mankani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.