२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस
By राजू हिंगे | Updated: April 4, 2025 20:42 IST2025-04-04T20:41:08+5:302025-04-04T20:42:11+5:30
२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करावा

२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यात या रुग्णालयाने नियमाचे पालन करण्यात कसूर केली आहे. दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९च्या तरतुदीचे उल्लंघन या रुग्णालयाने केले आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आणि संबंधीत डॉक्टरांचा खुलासा पत्रासह सादर करावा, अशा आशयाची नोटीस पुणे महापालिकेने या रुग्णालयाला दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्याचे आरोप केले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठविली आहे. या नोटीसीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने १४ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या अधिसूचनेतील नियम ११ (जे) मधील अनु क्र. १ ते ३ पालन करण्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे.
ही बाब गंभीर स्वरुपाची असून, दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १४ जानेवारी २०२२मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करावा, असे नोटीसीत नमूद केले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी ही नोटीस बजावली आहे.