राज्यात अल्पभूधारकांची जमीन आक्रसली; जमीनदार मात्र आणखी गब्बर
By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 14:57 IST2025-03-12T14:56:43+5:302025-03-12T14:57:16+5:30
कृषी गणनेतून धक्कादायक वास्तव आले समोर; राज्यात सध्या १ कोटी ६८ लाख ९८ हजार ६७८ शेतकरी

राज्यात अल्पभूधारकांची जमीन आक्रसली; जमीनदार मात्र आणखी गब्बर
पुणे : राज्यात सध्या कृषी गणना सुरू असून, पहिल्या टप्प्यातील अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २०१०-११च्या तुलनेत वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली असून, एकूण जमीन धारणा क्षेत्रातही दहा टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी सरासरी जमीन धारणा क्षेत्रात मात्र घट झाली आहे. दुसरीकडे मोठ्या अर्थात ९ ते २० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी घटली आहे.
राज्यात दर पाच वर्षांनी कृषी गणना करण्यात येते. त्यानुसार २०२१-२२ मध्ये कृषी गणना प्रस्तावित होती. मात्र, कोरोनामुळे ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात कृषी गणना केली जात आहे. या गणनेचा पहिला टप्पा अर्थात शेतकरी संख्या व त्यांच्याकडील जमीन क्षेत्र मोजण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सध्या १ कोटी ६८ लाख ९८ हजार ६७८ शेतकरी असून, त्यांच्याकडे एकूण दोन कोटी ४ लाख ९६ हजार ६२३ हेक्टर जमीन आहे, तर २०१०-११च्या तुलनेत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर जमिनीच्या क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे.
सहमालकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ८६ हजार ८६० इतकी असून, यात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ७४ टक्क्यांची घट दिसून येत आहे. त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्र सध्या ४ लाख २६ हजार ८८० हेक्टर असून, यातही ६० टक्क्यांची घट दिसून येत आहे. अर्थात कुटुंबाकडील जमिनीचे क्षेत्र घटत असून, वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात २०१०-११ मध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांकडे सरासरी जमीन १.४४ हेक्टर होती. त्यात २०२१-२२ मध्ये घट होऊन ते आता १.२१ हेक्टर इतकी झाली आहे. अर्थात वैयक्तिक शेतकऱ्यांकडील सरासरी जमिनीत घट होत असून, एकत्रित कुटुंब पद्धतीचा त्याग केल्यामुळेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या संख्येत तसेच त्यांच्या एकूण क्षेत्रात वाढ दिसून येत आहे.
राज्यात ९ ते २० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५८ हजार ८९१ असून, त्यांच्याकडील जमिनीचे एकूण क्षेत्र १२ लाख ३६ हजार ६५५ हेक्टर इतके आहे, तर २०१०-११च्या तुलनेत अशा शेतकऱ्यांची संख्या घटली असली तरी त्यांच्याकडील एकूण जमिनीच्या क्षेत्रात मात्र १४ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. यात २०१०-११च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ८९ने कमी झाली असून, त्यांच्याकडे क्षेत्रात मात्र, एकूण १ लाख ५२ हजार २२६ हेक्टरने वाढ झाली आहे. २०१०-११ मध्ये या शेतकऱ्यांकडे सरासरी १५.९६ हेक्टर जमीन होती. मात्र, २०१२-२२ मध्ये यात वाढ होऊन सरासरी क्षेत्र २०.९९ हेक्टर इतके झाले आहे.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सरासरी जमीन धारणा क्षेत्रात घट झाली आहे. परिणामी कुटुंबाच्या गरजेइतके उत्पन्न मिळत नसल्याने खेडी ओस पडताहेत व शहरांमधील स्थलांतर वाढले आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे