अवसरी (पुणे जि. )- पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) परिसरात निष्काळजीपणे चालविलेल्या टेम्पोला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अधिकच्या माहितीनुसार, हा अपघात दि. १५ ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पारगाव गावच्या हद्दीत झाला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याजवळ वजन काट्यावर टेम्पो (एम.एच. १२ एल.टी. ९९१३) मागे घेताना, शिरूरहून पारगावकडे येणारी दुचाकी (एम.एच. १४ ए.बी. ४९०३) ट्रकमधून बाहेर आलेल्या लोखंडी पत्र्याला धडकली. या धडकेत अविनाश क्षीरसागर गंभीर जखमी झाला. उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अपघातात क्षीरसागर यांचे आई-वडील देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत प्रकाश क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.