कोळवण : पुणे जिल्ह्यात स्वर्गीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगरोडसह विविध विकासकामे गतीने सुरू होती. त्यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्याला मोठा धक्का बसला असून विकासाला चालना देणाऱ्या पुणे रिंगरोडला ‘स्व. नामदार अजित पवार रिंग रोड’ असे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करावा, अशी मागणी भोर–मुळशी–राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार मांडेकर यांनी मतदारसंघातील राजगड, तोरणा व रायरेश्वर हे राज्य संरक्षित किल्ले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत; मात्र या किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याची बाब मांडली. विशेषतः रायरेश्वर किल्ल्यावर चढण्यासाठी रस्ता व पायऱ्या सुस्थितीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
‘महावितरण’च्या कामांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीमार्फत रोहित्र बसविण्यासाठी निधी दिला जातो; परंतु कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. भोर–मुळशी–राजगड मतदारसंघात तीन तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा काही भाग येत असल्याने सध्याची ५ ते ६ कोटी रुपयांची तरतूद अपुरी ठरत आहे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान ५ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
वाळेण व कोदवडी पुलांच्या निधीची मागणी
मुळशी तालुक्यातील वाळेण पूल व राजगड तालुक्यातील कोदवडी पूल आचारसंहितेपूर्वी पडल्याने नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाळेण पुलासाठी ४ कोटी व कोदवडी पुलासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश स्व. अजित पवार यांनी दिले होते. त्या निधीची लवकर पूर्तता करावी, अशी मागणी आमदार मांडेकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली.
Web Summary : MLA Mandekar requested that the Pune Ring Road be named after the late Ajit Pawar in a district planning meeting, citing his contributions to development projects including the ring road. He also requested funds for forts and roads.
Web Summary : विधायक मांडेकर ने जिला योजना बैठक में पुणे रिंग रोड का नाम दिवंगत अजित पवार के नाम पर रखने का अनुरोध किया, जिसमें रिंग रोड सहित विकास परियोजनाओं में उनके योगदान का हवाला दिया। उन्होंने किलों और सड़कों के लिए धन भी मांगा।