पुणे : शहरात आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. अडीच वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरींमुळे पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुण्यात कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या आसपास होता. अंगाची लाहीलाही करणाऱ्या असहाय उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. त्यामुळे शुक्रवारी पावसाच्या सरींनी शहरातील वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. हडपसर, शिवाजीनगर, कात्रज, कोरेगाव पार्क, सिंहगड रस्ता, पाषाण यांसह उपनगरांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरींमध्ये भिजण्याचा आनंद पुणेकरांनी लुटला.
काही भागांत जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाण पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक काहीशी मंदावली होती. उपनगराच्या काही भागांमध्ये वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील आठवड्यात शहराच्या वाढलेल्या कमाल तापमानात घट झाली होती. दि. १४ मेपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, शहराच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला होता. त्यानुसार आज पावसाला सुरुवात झाली आहे.