पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यात पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पब, बार मालकांनी एक दिवसाचा परवाना घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
पुणे शहराच्या कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या रस्त्यांवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर गर्दी करत असतात. त्यामुळे होणाऱ्या गर्दी विचारात घेऊन मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी ५ नंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई
वाहनांवरून अनधिकृतपणे कर्कश आवाज निर्माण करणारे किंवा ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई होणार आहे. याशिवाय, नववर्ष स्वागताच्या उत्साहात गोंगाट किंवा सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
मद्यपींवर असणार करडी नजर..
मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालवणारे दुचाकीस्वार, कार चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रीथ ॲनलायजर यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. तपासणीसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिक नळी डिस्पोजेबल असणार आहे, त्याचा पुनर्वापर करण्यात येणार नाही. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद...
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी पाच नंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.