उन्हाळ्यात पुणेकरांना मिळतोय गारवा..! किमान तापमान घसरले; पारा १३ अंशावर
By श्रीकिशन काळे | Updated: March 7, 2025 17:37 IST2025-03-07T17:37:15+5:302025-03-07T17:37:44+5:30
महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर व उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये धडकल्याने थंडी वाढली आहे.

उन्हाळ्यात पुणेकरांना मिळतोय गारवा..! किमान तापमान घसरले; पारा १३ अंशावर
पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणेकरांना रात्री व दिवसाही उकाड्याने हैराण केले होते. पण गुरूवारपासून (दि.६) उकाडा कमी होऊन गारठा अनुभवायला येत आहे. किमान तापमान १३ अंशावर गेल्याने सकाळी पुणेकर थंडीने गारठून जात आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे हा गारठा निर्माण झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
राज्यामध्ये दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. किमान तापमानात घट झाल्याने राज्यामध्ये थंडी पडली आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, बुधवारपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंड वारे येत आहे. हे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर व उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये धडकल्याने थंडी वाढली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता.
तो अटकाव वारा वहन प्रणालीतील बदलातून जाणवत आहे. ही तापमानाती चढ-उतार पुढील काही दिवस राहणार आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला आहे. ही परिस्थिती शनिवारपर्यंत (दि.८) राहण्याची शक्यता आहे.’’
पुण्यामधील किमान तापमानात तीन-चार अंशाने घसरण झाली आहे. त्यामु शुक्रवारी (दि.७) एनडीए १३.०, बारामती १२.३, शिवाजीनगर १३.२ अंशावर नोंदवले गेले. दुपारी देखील गारवा जाणवत होता. दोन दिवस झाले पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली.
पुणे किमान तापमान :
बारामती : १२.३
एनडीए : १३.०
माळिण : १३.१
राजगुरूनगर : १३.६
इंदापूर : १४.२
कोरेगाव पार्क : १८.४
चिंचवड : १९.८
मगरपट्टा : २०.०
वडगावशेरी : २१.१