Pune Rave Party : खडसे कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचा कट? एकनाथ खडसे यांचा पोलिस तपासावर सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:34 IST2025-07-29T11:26:16+5:302025-07-29T11:34:51+5:30
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Pune Rave Party : खडसे कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचा कट? एकनाथ खडसे यांचा पोलिस तपासावर सवाल
पुणे - खराडीतील ‘स्टे बर्ड हॉटेल’मध्ये रविवारी पहाटे झालेल्या ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकनाथ खडसे म्हणाले, ही कारवाई मुद्दामून आमच्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी रचलेली योजना आहे. त्यांनी पोलिसांची कारवाई, ड्रग्ज रिपोर्टचा अभाव, माध्यमांमध्ये फुटलेली माहिती आणि प्रांजल खेवलकर यांना केलेला प्राथमिक आरोपी यावरून अनेक मुद्दे उपस्थित केले.
खडसे पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी रेव्ह पार्टी झाली, तिथे ना मोठा गोंधळ होता ना संगीत, मग रेव्ह पार्टी कशी? पोलिसांनी कारवाईचे व्हिडिओ मीडिया हाती दिले, यामागे काय हेतू होता? चेहऱ्यांचा प्रसार करून बदनामी केली जात आहे. प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही पूर्व गुन्हा नाही, तरी त्यांना 'मुख्य आरोपी' का घोषित केले? अमली पदार्थ एका महिलेच्या बॅगमधून सापडले, तरी तिला प्रमुख आरोपी न करता प्रांजल यांना का लक्ष्य केलं? दारूचा रिपोर्ट तातडीने मीडियात कसा पोहोचतो, पण ड्रग्ज चाचणीचा अहवाल अद्याप का मिळत नाही? माझ्यावरही पोलिसांकडून पाळत ठेवली जात होती. साध्या वेशातील पोलिस वेस्टिन हॉटेलच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्हीत दिसतात हे संशयास्पद नाही का? असे प्रश्न विचारत खडसे यांनी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे.
राजकीय सूडभावनेचा आरोप
खडसे म्हणाले, हे फक्त ड्रग्ज पार्टीचे प्रकरण नाही, हे आमच्या कुटुंबावर डाग लावण्याचे षडयंत्र आहे. त्यांनी नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरण, तसेच प्रफुल लोढा प्रकरणांचा दाखला देत सरकारच्या दुहेरी भूमिकेवरही टीका केली. एका बाजूला तत्काळ कारवाई होते, तर दुसऱ्या बाजूला ठोस पुरावे असूनही गप्प बसले जाते. असा आरोप त्यांनी केला.
तत्पूर्वी, प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून, त्यांचे ब्लड सॅम्पलदेखील घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याबाबत वैद्यकीय तपासणीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ड्रग्सचे सेवन केले होते का नाही? हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.