पुणे : शहरातील महत्त्वाच्या आयटी कंपन्या असलेल्या मगरपट्टा, भेकराईनगर भागात मंगळवारी संततधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. चौकाचौकांत तसेच रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी वाहतूक संथ झाली होती. ही स्थिती हडपसरच्या सोलापूर रस्त्यावरील पंधरा नंबर चौकापासून थेट स्वारगेटच्या घोरपडी पेठेच्या चौकापर्यंत होती.
संततधार पावसामुळे हडपसरमधील पंधरा नंबर चौकात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला नाल्याचे स्वरुप आले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. वाहतूक संथ झाल्याने चौकात कोंडी झाली होती.
पुढे रवी दर्शन चौकातही पाणी साचल्याने वाहतूक आणखी मंदावली. येथून हडपसर गाडीतळ, मगरपट्टा चौक, वैदुवाडी चौकापर्यंत कोंडी झाली होती. त्यापुढे रामटेकडी चौकातील पुलापासून थेट लष्कर वैद्यकीय महाविद्यालय अर्थात रेसकोर्सपर्यंत कोंडीच कोंडी पाहायला मिळाली. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. यात पीएमपीपासून सामान्य दुचाकीस्वारांपर्यंत सर्वांचाच समावेश होता.
रामटेकडी चौकातील कोंडीमुळे एक रुग्णवाहिका अडकली. या रुग्णवाहिकेला बाहेर पडण्यासाठी तब्बल २५ मिनिटे लागली. भैरोबानाला पोलिस चौकीच्या पुढे लष्कर महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीमुळे पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने येथे २०० मीटर लांबीच्या रस्त्यात किमान गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने किमान तीन ते चार वाहने बंद पडलेली होती. वाहनचालकांची समस्या आणि कोंडी लक्षात घेता दोन वाहतूक पोलिसांनी धोका पत्करत पाण्याला वाट करून देण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.
भैरोबानाला पोलिस चौकीपासून थेट धोबीघाट चौकापर्यंत रस्त्याची पुरेपूर वाट लागली आहे. परिणामी या सबंध पाच ते सहा किलोमीटर परिसरात केवळ खड्ड्यांचे साम्राज्य आहे. परिणामी खड्ड्यांमुळे पूलगेट चौकातही वाहतूक कोंडी झाली होती. सोलापूर बाजार पोलिस चौकीपासून गोळीबार मैदान चौकापर्यंतचा रस्ता तर वाहनचालकांंची परीक्षा घेतो. त्यामुळे गोळीबार मैदान चौकापर्यंत खड्ड्यांमुळे पाणी साचलेले होते. त्यामुळे सकाळपासूनच या भागात वाहतूक कोंडी होती.
येथील वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांच्या मते सकाळी अकराच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने कोंडी वाढली होती. ही कोंडी दुपारी एकपर्यंत पावसाचा जोर कमी होईपर्यंत कायम होती. त्यापुढे धोबीघाट चौकातही हीच स्थिती होती. शंकरशेठ चौकातही मार्केट यार्डाच्या बाजूनेही कोंडी झाली होती. एरवीही सोलापूर रस्त्यावर हडपसरपर्यंत कायमच वाहतूक कोंडी होत असली तरी मंगळवारच्या पावसामुळे त्यात आणखीनच भर पडली. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते.