पुणे : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
आज (१९ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणातून विसर्ग १९,३३४ क्युसेक्स वरून वाढवून २५,६९६ क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीपात्रातील ‘ब्लू लाईन’ क्षेत्रात नागरिकांनी उतरू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
नदीपात्रात असलेली वाहने, जनावरे किंवा साहित्य तातडीने हलविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि पवना ही चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत.