होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत; भूषणसिंह राजे होळकर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:51 IST2025-03-27T12:42:27+5:302025-03-27T12:51:32+5:30
वाघ्या श्वान प्रकरणाला जातीय रंग देऊ नका; भूषणसिंह राजे होळकर यांनी स्पष्ट केली भूमिका

होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत; भूषणसिंह राजे होळकर संतापले
पुणे -रायगडावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना भूषणसिंह राजे होळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की,'महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय.
भूषणसिंह राजे होळकर यांनी वाघ्या श्वानाच्या अस्तित्वावर भाष्य करण्यास नकार दिला, मात्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी, अशी मागणी केली. संजय सोनवणी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या अभ्यासकांना समितीत घ्यावे. जेणेकरून ऐतिहासिक सत्य समोर येईल. असेही ते म्हणाले आहे. त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे. इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी शासनाने मध्यस्थी करावी, अशी त्यांनी विनंती केली.
ते पुढे म्हणाले,'होळकरांनी रायगडावरील शिव समाधीसाठी मोठा निधी दिला होता. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी योगदान दिले, त्याच्या स्पष्ट नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे, वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे? असा सवाल उपस्थित केला.
संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेवर इशारा
भूषणसिंह राजे यांनी संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालण्याची गरज आहे, असे मत मांडले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यामुळे, होळकर इंग्रजांना घाबरत होते असे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहास किती खोल आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
राजकीय अजेंडा चालणार नाही
येत्या ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सगळ्या संघटनांना समज द्यावी आणि हा वाद योग्य पद्धतीने सोडवावा,असे त्यांनी म्हटले.
शिवराय आणि अहिल्यादेवींच्या कार्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही
त्यांनी सांगितले की, आमच्या घराण्याने शिवरायांसाठी दिलेल्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा. तुकोजी होळकर यांच्या स्मरणार्थ रायगडावर फलक लावावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लागू नये, अन्यथा तीव्र विरोध होईल.
मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडणार
भूषणसिंह राजे होळकर यांनी सांगितले की, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा संपूर्ण विषय मांडणार आहे. तसेच, ताराराणीच्या समाधीच्या संवर्धनावर भर द्यावा, औरंगाबादच्या कबरीपेक्षा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकीय हेतूने कोणीही ऐतिहासिक सत्य बदलण्याचा किंवा विकृत करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय स्वरूप दिले जाते, मात्र हा विषय ऐतिहासिक आहे आणि तो तसेच पाहिला जावा. असेही त्यांनी स्पष्ट केले.