कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले
By राजू इनामदार | Updated: March 12, 2025 10:55 IST2025-03-12T10:55:32+5:302025-03-12T10:55:59+5:30
पक्षत्यागाचे प्रमाण वाढले : आघाडीचा शक्तीपात तर युती ताकदवान

कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले
पुणे : एकएक पान गळावया लागले, अशी पानगळती ऐन चैत्रपालवीच्या वेळी महाविकास आघाडीवर आली आहे. नवी पालवी फुटणे दूरच, आहे ती पाने सांभाळून कशी ठेवायची, असा प्रश्न नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. सत्ता नसल्याने आघाडीचा राजकीय शक्तीपात होत असून, त्यातच महापालिका निवडणूकही लांबणीवर पडल्याने दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील इच्छुक कार्यकर्ते दूर जाऊ लागले आहेत. महायुतीत आवक वाढल्याने त्यांचा मात्र राजकीय जोर वाढत आहे.
आघाडीत पळापळ
काँग्रेसचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या एकाच वेळी ५ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला जवळ केले. याच पक्षाचे राजेश पळसकर यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमधीलच युवक शाखेचे काही स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) पक्षातून, तर फुटीच्या वेळेसच अनेक माजी नगरसेवकांनी आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत अजित पवार यांच्या पक्षात उडी घेतली. शरद पवार यांच्या समवेत असलेले अजूनही काही जण अजित पवार यांच्याकडे आशेने पाहत आहेत. तिथेच खरे भवितव्य असल्याची खात्री त्यांना पटू लागल्याचे दिसत आहे.
महापालिका निवडणुकीचे कारण
एकूणच महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस या तीनही पक्षांच्या शहर शाखांमधून बरेच जण बाहेर पडत आहेत. त्या तुलनेत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची राजकीय स्थिती भक्कम होत चालल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी यामागे आहे. न्यायालयीन कारणांमुळे आता ही निवडणूक किमान या वर्षात होत नाही, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे त्याआधीच स्वत:ची राजकीय स्थिती भक्कम करून घेण्याकडे बहुसंख्य माजी नगरसेवकांचा, तसेच नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांचा प्रयत्न आहे.
महायुतीकडेच कल
सद्य:स्थितीत महायुती राजकीय दृष्ट्या भक्कम स्थितीत आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष भाजप आहे. त्याखालोखाल अजित पवार यांचा राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यामुळेच भाजपकडे अनेकांचा कल आहे. ठाकरे सेनेतून एकदम ५ नगरसेवक भाजपकडे जाण्यामागे तिथून निवडून येण्याची हमी हेच कारण आहे. धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर लोकसभा व मग विधानसभा निवडणूकही त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपच्या विरोधात लढवली. त्यामुळे भाजपचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे धंगेकर यांनी शिंदेसेनेची निवड केली असल्याची चर्चा आहे.
हे नाही तर ते पण युतीच
महापालिकेची आगामी निवडणूक अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लढवायची आहे. त्यांची सलग तीन वर्षे प्रतिक्षा करण्यात गेली. निवडणूक होणार अशा वावड्या उठल्या व त्यात त्यांचा बराच खर्चही झाला आहे. आता उभे रहायचे तर निवडून येण्यासाठीच असा त्यांचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणूक एकत्र लढले तर ठीकच पण वेगवेगळे लढले तरीही युतीत तीन पक्ष असल्याने हे नाही तर ते, पण आधी आघाडीतून तर बाहेर पडू अशा विचारात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.