नामदेव जाधव यांना काळं फासणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडचणी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 18:23 IST2023-11-19T18:19:29+5:302023-11-19T18:23:12+5:30
शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील नवी पेठ येथे नामदेव जाधव यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं होतं.

नामदेव जाधव यांना काळं फासणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडचणी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे : मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवल्यानंतर भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. तर दुसरीकडे, नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा नसल्याचा दावा करत सोशल मीडियावर वादाला तोंड फोडलं. तसंच शरद पवार यांच्यामुळेच आजवर मराठा समाज आरक्षणापासून दूर राहिल्याचा दावाही त्यांनी केला. जाधव यांच्याकडून शरद पवार यांच्यावर सातत्याने होत असल्याच्या आरोपांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यात नामदेव जाधव यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं. या घटनेप्रकरणी आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवनासमोर शनिवारी सायंकाळी नामदेव जाधव यांना काळ फासण्यात आलं होतं. त्यानंतर जाधव यांच्या तक्रारीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी राष्ट्रवादीच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पुण्यात काल नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर काल भांडारकर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव हे पत्रकारांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पत्रकार भवनाजवळ आले आणि त्यांनी जाधव यांना काळं फासलं. तसंच कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना धक्काबुक्की केल्याने काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सदर कार्यकर्त्यांना अडवत नामदेव जाधव यांना कारमध्ये बसवलं.
दरम्यान, "विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. मी कागद दाखवतो, पण समोरचे लोक दंडुके दाखवतात. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असं तुमचे नेते सांगतात. पण जर तुमच्या हातून असं कृत्य घडलं तर तुमच्याच नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसेल. जिजाऊंच्या वंशजाच्या तोंडाला काळे फासलं म्हणून तुम्हाला कदाचित यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेष उपोषणाला बसावं लागेल," असं म्हणत नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचलं होतं.