Pune Police Corona News : Increased risk of corona in Pune police force also; | पुणे पोलीस दलातही कोरोनाचा वाढला धोका;१४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी घेताहेत उपचार

पुणे पोलीस दलातही कोरोनाचा वाढला धोका;१४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी घेताहेत उपचार

पुणे : शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली असून पोलीस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. अशात सध्या शहर पोलीस दलात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला केवळ ३ ते ४ पोलिसांना लागण होत होती. आता हेच प्रमाण १५ च्या पुढे गेले आहे. सध्या १४४ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना लागण झाली असून ते उपचार घेत आहेत.

आतापर्यंत १ हजार ७०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १२ जणांचा मृत्यु झाला आहे. संसर्ग वाढू लागल्याने काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. तसेच त्यामुळे साप्ताहिक बैठकाही सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर पोलीस दलातील १ हजार ४७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली. पुणे शहरात कोरोना संसर्ग सर्वच पातळीवर वाढू लागला. तसा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या १४४ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर हॉस्पिटल तसेच घरी उपचार करण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आता पुन्हा हॉस्पिटलमधील काही बेड राखीव ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कोरोनासंबंधी कोणती काळजी घ्यायची याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लसीकरणानंतर आता पोलिसांच्या कुटुंबियांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. 
..........
पोलीस दलात ९५ टक्के लसीकरण पूर्ण
शहर पोलीस दलातील ९५ टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ८५ टक्के पोलिसांनी पहिला डोस घेतला आहे. तर १० टक्के पोलिसांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे ५ टक्के पोलिसांनी अद्याप लस घेतलेली नाही़. 
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Police Corona News : Increased risk of corona in Pune police force also;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.