पिटबुल श्वान डायनाने तरसांशी दिला जीवघेणा लढा; मालकाची व शेताची केली सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:51 IST2025-09-16T19:50:42+5:302025-09-16T19:51:28+5:30
नसरापूर : भोर तालुक्यातील दीडघर येथील एका शेतात राहणाऱ्या व्यक्तीच्या घरावर तीन रानटी तरसांनी हल्ला चढवला. मात्र, खरा मित्र ...

पिटबुल श्वान डायनाने तरसांशी दिला जीवघेणा लढा; मालकाची व शेताची केली सुरक्षा
नसरापूर : भोर तालुक्यातील दीडघर येथील एका शेतात राहणाऱ्या व्यक्तीच्या घरावर तीन रानटी तरसांनी हल्ला चढवला. मात्र, खरा मित्र आणि निष्ठावंत साथीदार ठरलेल्या डायना या पिटबुल जातीच्या मादा श्वानाने असीम धैर्य दाखवत या हल्ल्याला तोंड दिले आणि मालकासह शेतातील जनावरांचे प्राण वाचवले. या चित्तथरारक लढ्यात डायना गंभीर जखमी झाली असून, तिने एक कान आणि शेपटी गमावली आहे. दीडघर येथील शेतशिवारात झाडीतून उतरलेल्या तीन रानटी तरसांनी शेतातील छोट्या जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी डायनाने प्रसंगावधान राखत एका तरसाच्या गळ्याला घट्ट चावा घेतला. इतर दोन तरसांनी डायनाच्या कानावर आणि शेपटीवर हल्ला चढवला. रक्तबंबाळ अवस्थेतही डायनाने आपली पकड ढिली न करता लढा दिला. या झुंजीचा आवाज ऐकून शेतमालक आणि इतरांनी काठ्या, दगड आणि मोठ्या आवाजाने तरसांना पिटाळून लावले. यात डायनाने चावा घेतलेला एक तरस गंभीर जखमी झाला असून, त्याच्या मृत्यूची शक्यता डॉ. विराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.
या लढ्यात डायनाला एक कान, शेपटी आणि दुसऱ्या कानाचा काही भाग गमवावा लागला. शेतमालक स्वतः व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. तसेच, शिरवळ पशु महाविद्यालयाचे डॉ. अजित माळी यांनी तत्काळ उपचार करून डायनाचे प्राण वाचवले. या घटनेने दीडघर परिसरात खळबळ उडाली असून, डायनाच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्वानाची मालकाप्रती निष्ठा आणि जीव धोक्यात घालून दिलेली साथ याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.