Zilla Parishad Election : भिगवण जिल्हा परिषद गटात इच्छुकांची लगबग; उमेदवारीवरून रस्सीखेच तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:27 IST2025-11-06T11:25:03+5:302025-11-06T11:27:51+5:30
- पक्षनेतृत्वाची वाढणार डोकेदुखी, तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट

Zilla Parishad Election : भिगवण जिल्हा परिषद गटात इच्छुकांची लगबग; उमेदवारीवरून रस्सीखेच तीव्र
- तुषार हगारे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील नेहमी चर्चेत असणारा भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गट यंदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक नेत्यांनी आपल्या पत्नी, आई किंवा सुना यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सुरुवातीला हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव राहील, अशी शक्यता होती. मात्र, लोणी काळभोर गट अनुसूचित जातीसाठी राखीव ठरल्यानंतर भिगवण गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला आणि इच्छुक महिलांची संख्या झपाट्याने वाढली.
या गटावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पारंपरिक वर्चस्व राहिले आहे. मात्र, भाजप आणि हर्षवर्धन पाटील गट आता मैदानात उतरण्याची शक्यता असून, त्रिकोणी लढतीचे संकेत मिळत आहेत. भिगवण गटात धनगर समाजाचे मतदार निर्णायक आहेत; त्यानंतर मराठा आणि वंजारी मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी प्रत्येक गट रणनीती आखताना दिसत आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे हनुमंत बंडगर यांनी काँग्रेस (आय) चे संपत बंडगर यांच्यावर निसटता विजय मिळवला होता. शेटफळगढे गणातून स्वाती वणवे, तर भिगवण गणातून संजय देहाडे विजयी झाले होते.
राष्ट्रवादीत १२ हून अधिक इच्छुक महिला
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रमिला जाधव (माजी जि. प. सदस्या), हेमा माडगे (माजी सरपंच), मेघना बंडगर (माजी पं. स. सदस्या), सारिका बंडगर (माजी सरपंच, मदनवाडी), आश्विनी नानासो बंडगर (विद्यमान सरपंच) आणि सोनाली स्वप्निल बंडगर यांच्यासह तब्बल दहा ते बारा महिला दावेदार आहेत. यामुळे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पक्ष नेतृत्वासमोर उमेदवार निवडीची डोकेदुखी निर्माण झाली आहे.
भाजप आणि हर्षवर्धन पाटील गटाची हालचाल
भाजपकडून तालुका अध्यक्ष तेजस देवकाते यांच्या पत्नी कोमल बंडगर (देवकाते) या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे यांच्या घरातील महिलेलाही तिकीट मिळू शकते. राष्ट्रवादीतून नाराज झालेले काही इच्छुक भाजपकडे झुकण्याची शक्यता असल्याने या गटात समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. हर्षवर्धन पाटील गटाकडून मीनाक्षी संपत बंडगर आणि सुष्मा प्रवीण वाघ (तक्रारवाडी) यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
अनुष्का भरणे चर्चेत
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्नुषा अनुष्का अनिकेत भरणे यांचे नाव या गटातील प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. गेल्या सात वर्षांपासून त्या गटात सक्रिय असून, विधानसभा निवडणुकीत प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली होती. कार्यकर्त्यांकडून त्यांना उमेदवारी देण्याची मागणी होत असली तरी यावर अंतिम निर्णय कृषिमंत्री भरणे काय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गटातील गावे आणि आरक्षण
भिगवण जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
भिगवण गण (महिला राखीव) : भिगवण, भिगवण स्टेशन, मदनवाडी, डिकसळ, तक्रारवाडी, कुंभारगाव, पोंधवडी.
शेटफळगढे गण (सर्वसाधारण) : शेटफळगढे, लामजेवाडी, पिंपळे, निरगुडे, म्हसोबावाडी, लाकडी, अकोले, वायसेवाडी, निंबोडी, काझड, शिंदेवाडी.