हलाखीतून उभा राहिलेला सुवर्णवीर; लोहगावचा पैलवान एशियन यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक विजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:05 IST2025-11-04T11:02:14+5:302025-11-04T11:05:13+5:30
एशियन युथ गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा लोहगावचा पैलवान सनी ठरला युवकांसाठी प्रेरणास्थान

हलाखीतून उभा राहिलेला सुवर्णवीर; लोहगावचा पैलवान एशियन यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक विजेता
- अशोक काकडे
लोहगाव : इराणमधील बहरिनमधील मनामा येथे सुरू असलेल्या एशियन युथ गेम्समध्ये भारतासाठी ‘बीच कुस्ती’ प्रकारात ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावणारा लोहगावचा तरुण पैलवान सनी फुलमाळी (वय १७) आज देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. तळागाळातून उभा राहून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत घडलेला सनी हा मेहनत, चिकाटी आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण बनला आहे.
सनीचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. त्याचे वडील सुभाष फुलमाळी हे नंदीबैल घेऊन भविष्य सांगण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात, तर आई सुया, पिना, दाबणं विकून घरखर्च भागवते. झोपडीत राहणारे हे कुटुंब तीन पिढ्यांपासून हातावर पोट घेऊन जगत आले. सुभाष फुलमाळींनी आपल्या मुलांना नंदीबैलाच्या सावलीत तर वाढवले, पण त्यांचे भविष्य कुस्तीच्या अखाड्यात घडवण्याचा निश्चय केला.
लहानपणापासूनच सनीला कुस्तीची आवड होती. तो दररोज शेकडो दंडबैठका, जोर मारत स्वतःला तयार करत असे. रायबा तालीम, लोहगाव येथे प्रशिक्षक सोमनाथ मोझे व सदा राखपासरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कुस्तीचे धडे घेतले. सनीच्या चपळाईने प्रभावित होऊन प्रशिक्षकांनी त्याच्या वडिलांना त्याला अधिक प्रगत प्रशिक्षणासाठी ‘जानता राजा तालीम’मध्ये पाठवण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर सनीने ‘जानता राजा तालीम’मध्ये प्रवेश घेतला, पण महिन्याला पंधरा हजार रुपयांचा प्रशिक्षणखर्च कुटुंबासाठी अवघड ठरला. त्यावेळी सनीचे भाग्य खुलले. ‘जानता राजा तालीम’चे संदिपआप्पा भोंडवे पहलवान यांनी सनीचा खेळ पाहून त्याला दत्तक घेतले आणि संपूर्णपणे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुढील पाच वर्षांत भोंडवे यांनी सनीला केवळ खेळाडू नाही, तर शिस्तबद्ध आणि ध्येयवेडा खेळाडू म्हणून घडवले.
सनी दररोज ७०० ते ८०० जोर, दीड हजार दंडबैठका मारून स्वतःला मजबूत बनवत असे. त्याचा आवडता डाव ‘धाक’ प्रकाराचा होता. प्रत्येक स्पर्धेत त्याची झुंझार वृत्ती दिसून येत असे. स्थानिक पातळीवरील स्पर्धांमधून सुरू झालेला त्याचा प्रवास जिल्हा, राज्य आणि अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला.
बहरिनमधील एशियन युथ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर सनी आणि त्याच्या कुटुंबाचा आनंद शब्दातीत आहे. त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू, तर आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले. “माझा मुलगा देशासाठी काहीतरी करेल,” हा विश्वास सुभाष फुलमाळी यांनी आज सिद्ध करून दाखवला. आज सनीचे यश केवळ एका खेळाडूचे नाही, तर झोपडीतून सुरू झालेल्या स्वप्नांच्या प्रवासाचे प्रतीक आहे. त्याच्या मेहनतीने आणि प्रशिक्षकांच्या समर्पणाने परिस्थितीवर मात करून काय साध्य करता येऊ शकते, हे दाखवून दिले आहे.
सनी सध्या दहावीत शिकत असून, भविष्यात भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय त्याने मनाशी बाळगले आहे. त्याच्या या यशामुळे लोहगाव व पुण्याची मान अभिमानाने उंचावली आहे. सनी फुलमाळीचे हे यश म्हणज, जिद्द, मेहनत, संघर्ष आणि आशेचा सुवर्ण अध्याय होय...