पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:44 IST2025-08-05T19:44:16+5:302025-08-05T19:44:56+5:30
- राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार

पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का?
पुणे : काँग्रेसचे राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर पुण्यात ११ व १२ ऑगस्टला खडकवासला इथे होत आहे. पक्षाच्या ढासळत्या राजकीय स्थितीवर या शिबिरात चिंतन होणार का? त्यावर काही उपाय करण्याबाबत विचारविनिमय होणार का? असा प्रश्न अनेक वर्षांनी होत असलेल्या या शिबिराविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व अन्य काही काँग्रेस नेत्यांच्या शिबिरात अशी शिबिरे होत असत. काँग्रेसची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ती परंपराच होती. स्वातंत्र्यानंतरही ती बराच काळ सुरू होती. मात्र, पुढे ती खंडित झाली व नंतर तर बंदच झाली. पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या शिबिर परंपरेतील आहेत. त्यामुळेच त्यांनी ही खंडित परंपरा परत सुरू केली असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांच्या या शिबिराला पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहेत.
किमान २५० ते ३०० जण या शिबिराला उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण यांच्याकडे या शिबिराचे यजमानपद देण्यात आले आहे. येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिबिर स्थळी आण्यापासून ते त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पक्षाने समित्या स्थापन केल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी त्यासाठी सोमवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची काँग्रेसभवनावर खास बैठक घेतली. त्यात त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांना, अधिकारी व्यक्तींना शिबिरात बोलण्यासाठी म्हणून खास निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याचेही नियोजन केले जात आहेत. काँग्रेसचा इतिहास, ध्येेयधोरणे, विचारधारा याविषयी शिबिरात उहापोह होईल.
अशा शिबिरांमधून पक्ष पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होते. निष्ठा पक्क्या होतात. सरकारच्या चुकीच्या निर्णयांचे विश्लेषण करण्याची दृष्टी तयार होते. राजकारण म्हणजे केवळ पदांचा, सत्तेचा खेळ नाही तर समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे ही बाब मनावर बिंबते. यापुढेही वेगवेगळ्या स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी अशा शिबिरांचे स्थानिक पातळीवर आयोजन केले जाईल. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस