वैवाहिक नाते तोडण्यास कारणीभूत ठरलेल्या ‘तिसऱ्या’साठी नाते ठरणार त्रासदायक ?
By नम्रता फडणीस | Updated: September 28, 2025 16:31 IST2025-09-28T16:30:40+5:302025-09-28T16:31:56+5:30
- पती-पत्नीचे नाते बिघडणे या आधारावर दाखल केलेला नागरी दावा दिल्ली उच्च न्यायालयाने धरला ग्राह्य

वैवाहिक नाते तोडण्यास कारणीभूत ठरलेल्या ‘तिसऱ्या’साठी नाते ठरणार त्रासदायक ?
पुणे : पती-पत्नी दोघांपैकी कुणाचेही विवाहबाह्य संबंध असतील आणि एखाद्या तृतीय व्यक्तीने (प्रियकर/प्रेयसी) नात्यात येऊन नाते बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा जोडीदार कथित प्रियकर किंवा प्रेयसी विरुद्ध नुकसानभरपाईसाठी नागरी दावा दाखल करू शकतो, असे सांगितले तर विवाहबाह्य संबंध असलेल्या जोडप्यासह त्यांच्या प्रियकर किंवा प्रेयसीचे कदाचित धाबे दणाणतील. पण, हे प्रत्यक्षात घडले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ म्हणजेच वैवाहिक प्रेमपूर्ण नात्यात तृतीय पक्षाने हस्तक्षेप केल्यामुळे पती-पत्नीचे नाते बिघडणे. या आधारावर दाखल केलेला नागरी दावा ग्राह्य धरण्यात आला आहे. या दाव्याच्या निमित्ताने आज भारतात ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ हा मुद्दा समोर आला आहे. हे समाजासाठी आणि न्यायप्रणालीसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबधांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना काळात विवाहबाह्य संबंधाची अनेक प्रकरणे समोर आल्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले. यामध्ये घटस्फोट हा एकमेव पर्याय असला, तरी नात्यात हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. तो किंवा ती कायम नामोनिराळे राहतात. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या नागरी दाव्याबाबत विधी क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे हा नागरी दावा
दिल्ली उच्च न्यायालयाने शेली महाजन विरुद्ध भानुश्री बहेळ व अन्य या प्रकरणात न्यायालयाने ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ म्हणजेच वैवाहिक नात्यात तृतीय पक्षाने हस्तक्षेप केल्यामुळे पती-पत्नीचे नाते बिघडणे. या आधारावर दाखल केलेला नागरी दावा ग्राह्य धरला आहे. या प्रकरणात पत्नीने पतीच्या कथित प्रेयसीविरुद्ध ५ कोटींची नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली, त्यात न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले की, वैवाहिक नात्यात तृतीय पक्षाने जाणूनबुजून हस्तक्षेप केल्यास ते जाणीवपूर्वक केलेले चुकीचे कृत्य (इंटेन्शनल टॉर्ट) मानले जाऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाने प्रतिवादींना समन्स बजावले असून, नुकसानभरपाई द्यायची की नाही? यावर पुढील टप्प्यात सुनावणी होणार आहे.
‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ म्हणजे काय?
‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ ही एक कायदेशीर संकल्पना आहे. याचा अर्थ जेव्हा एखादा तृतीय पक्ष (उदा. पती/पत्नीचा प्रियकर/प्रेयसी किंवा इतर कोणी व्यक्ती) जाणूनबुजून पती-पत्नीच्या नात्यात हस्तक्षेप करते, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करते आणि वैवाहिक नाते तुटण्यास कारणीभूत ठरते, तेव्हा त्याला ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’असे म्हणतात. अशा परिस्थितीत बाधित पती/पत्नी नुकसानभरपाईसाठी नागरी दावा (दिवाणी दावा) दाखल करू शकतात.
भारतातील स्थिती काय ?
भारतात अजूनही हा संकल्पना पूर्णपणे कायद्याने मान्य झालेली नाही. परंतु, काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ हे जाणीवपूर्वक केलेले चुकीचे कृत्य (इंटेन्शनल टॉर्ट) मानता येईल, असे निरीक्षण नोंदविले आहे.
आज भारतात ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ याबाबत स्पष्ट कायदेशीर तरतूद नसली, तरी न्यायालये अशा दाव्यांना ग्राह्य धरू लागली आहेत. यापूर्वी पर्याय फक्त घटस्फोटाच होता. परंतु, आता यामध्ये नुकसानभरपाईही मिळू शकते. - ॲड. राणी कांबळे-सोनावणे
पती-पत्नीचे नाते तुटण्यास कारणीभूत ठरणारी व्यक्ती कायमच नामोनिराळी राहते. ज्या व्यक्तीमुळे संसार तुटतोय, त्यालाही जबाबदार धरले पाहिजे. यात ओटीटी वेबसीरिजनेही भर पाडली आहे. आज या वेबसीरिजमध्ये विवाहबाह्य संबंधांना ग्लोरिफाय केले जात आहे. त्यामुळे हे केले, तर नॉर्मल असते, असा लोकांचा समज होऊ लागला आहे. पण, या तात्पुरत्या आनंदात चांगले नाते तुटत आहे, याचा कुणी विचार करत नाही, त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. - ॲड. प्रसाद निकम, कौटुंबिक न्यायालयातील वकील