पाईट ( पुणे जि.) : श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या महिला भाविकांच्या भीषण अपघातात १२ महिलांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. या दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पापळवाडी, ता. खेड येथे दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली आणि सांत्वन केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाकडून आणि स्वतःच्या वतीने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ग्रामपंचायत सदस्य शारदाताई चोरघे, शकुंतला चोरघे, सुलाबाई बाळासाहेब चोरघे, सुमन पापळ, शोभा पापळ, पार्वताबाई पापळ, फसाबाई सावंत, बाईडाबाई दरेकर, संजीवनी दरेकर, मीराबाई चोरघे, मंदा दरेकर आणि पार्वताबाई पापळ यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. तसेच, सर्व मृतांच्या कुटुंबीयांशी एकत्रित चर्चा करून त्यांचे दु:ख समजून घेतले.
जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेट देऊन डॉ. गोऱ्हे यांनी सर्व रुग्णांना एका सुसज्ज रुग्णालयात एकत्रित उपचार मिळण्याबाबत विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, पुढील उपचारांसाठी बसव्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली असता, त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
अंकुश दरेकर यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची संपूर्ण माहिती डॉ. गोऱ्हे यांना दिली. यावेळी उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी अनिल दौडे, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहायक गटविकास अधिकारी सुनील भोईर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने, मंत्रालय विशेष कर्तव्य अधिकारी आनंद देवकर, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा उपप्रमुख प्रकाश वाडेकर, प्रदूषण महामंडळाचे सदस्य नितीन गोरे, विजयताई शिंदे, मनीषा पवळे, पोलिस उपनिरीक्षक दत्ता जाधव, पाईट मंडळ अधिकारी मनीषा सुतार, ग्रामविकास अधिकारी अनिल फुलपागर यांच्यासह जयसिंग दरेकर, बाळासाहेब पापळ यांनी चर्चेत सहभाग घेतला.