पुणे शहरात गुटख्याची सर्रास विक्री; ड्रग्ज,अवैध दारूप्रमाणेच गुटख्यावर कारवाई का नाही..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:17 IST2025-08-01T10:17:39+5:302025-08-01T10:17:56+5:30
- पोलिसांची गुटख्यावर धडक कारवाई मोहीम नाहीच

पुणे शहरात गुटख्याची सर्रास विक्री; ड्रग्ज,अवैध दारूप्रमाणेच गुटख्यावर कारवाई का नाही..?
पुणे : राज्यात दि. १९ जुलै २०१२ रोजी गुटखा बंदी लागू झाली असून, गुटख्याचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणूक यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. गुटखा विक्रीवर कडक बंदी असतानाही पुणे शहरात दिवसाढवळ्या खुलेआम विक्री होते. याकडे पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून उघड झाले आहे. शहराच्या विविध भागांतील पानटपऱ्यांवर गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थ सहज मिळतात. यामागे असलेल्या तस्कर साखळीच्या मुसक्या अद्याप आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
गुटखा तस्करी आणि विक्रीचे जाळे शहरात सर्वत्र पसरलेले आहे. दररोज कोट्यवधी रुपयांचा गुटखा पुण्यात येतो. कर्नाटक आणि सीमावर्ती भागांतून मोठ्या ट्रकमधून गुटखा शहरात आणला जातो. त्यानंतर छोट्या वाहनांतून विविध भागांत त्याचे वितरण होते. या साखळीत तीन ते चार प्रमुख गुटखा व्यापाऱ्यांचा सहभाग असून, त्यांच्या हालचालींची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असूनही त्यांच्याविरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ड्रग्ज, अवैध दारूप्रमाणेच गुटख्यावर कारवाई का नाही..?
पुणे पोलिसांकडून ड्रग्ज, अवैध दारू याप्रकरणी सातत्याने कारवाई केली जाते. त्याप्रमाणे गुटख्यावर मात्र किरकोळ स्वरूपाची जुजबी कारवाई केली जाते. पोलिसांना शहरात गुटखा कोठून येतो, गुटख्याचे शहरातील प्रमुख विक्रेते, गुटखा तस्कर यांच्याबाबत विस्तृत माहिती आहे. असे असतानाही पोलिसांकडून त्यांना अभय दिले जात असल्याचे नागरिक बोलत आहेत.
पोलिस ठाणी अन् चौक्यांच्या बाजूलाच मिळतो गुटखा
शहरातील बहुतांश पोलिस ठाणी, पोलिस चौक्या यांच्या आजूबाजूला असलेल्या पान टपऱ्यांवर राजरोसपणे गुटख्याची विक्री होते. ही बाबदेखील ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. असे असताना पोलिसांना गुटखा विक्री होत असल्याचे का दिसून येत नाही? हा खरा प्रश्न आहे. दि. १९ फेब्रुवारी रोजी काळेपडळ पोलिसांनी गुटख्यावर कारवाई करत ६४ लाखांचा गुटखा पकडला. त्यानंतर खडक पोलिसांनी दि. २४ जून रोजी दोन लाखांचा गुटखा पकडला.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिसांनी गुटखा तस्कराला ताब्यात घेतले होते. याच आरोपीवर खडक पोलिस ठाण्यात पूर्वीपासून दाखल गुन्ह्यात हाच तस्कर फरार होता. त्याला या गुन्ह्यात वर्ग करून घ्यावे, अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडेही दुर्लक्ष करून संबंधित आरोपीला त्या गुन्ह्यात दाखल केले गेले नाही. यावरून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अनेक शाळांच्या १०० मीटर परिसरात मिळतात हे पदार्थ...
शाळा, महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात नियमाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. असे असताना शहरातील बहुतांश शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याकडे शाळा प्रशासनानेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. शाळा प्रशासनाने पोलिसांना याबाबत डायल ११२ वर फोन करून कळविल्यास अशा विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करू, असे आश्वासन पुणे पोलिसांकडून देण्यात आले आहे.
आमचे कान अन् डोळे बना...
दि. २९ ऑगस्ट २०२४ पुणे पोलिसांकडून शाळा सुरक्षा परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये कोणत्याही अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, अथवा घडत असतील तर त्या रोखण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही जागरूक राहून आमचे कान आणि डोळे बना, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी होते. या शाळा सुरक्षा परिषदेसाठी शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शहरात ११ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. यांसह सत्तर लाख लोकसंख्या असलेल्या शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी साडेनऊ हजार पोलिस कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
शाळा, महाविद्यालयाने पुढाकार घेईनात...
शाळा परिसराच्या शंभर मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारची तंबाखू, गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्या असता कामा नयेत. यासाठी तुम्ही स्वतः शाळेपासूनचे अंतर सुनिश्चित करून घ्या. जर शाळेने सांगूनही संबंधित विक्रेता ऐकत नसेल तर आम्हाला सांगा. आमच्याकडे तक्रार आली की, तुमचे काम संपले. आम्ही महापालिकेला हाताशी घेत अशा विक्रेत्यांचा समूळ नाश करू, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही शाळा, महाविद्यालयाने पुढाकार घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणारे हेल्पलाइन नंबर..
१) महिलांच्या सुरक्षेसाठी - १०९१
२) आपत्कालीन पोलिस हेल्पलाइन नंबर - ११२
३) नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) - (व्हॉट्सॲप नंबर) - ८९७५९५३१००
लवकरच पोलिस दलात फेररचना करण्यात येणार आहे. त्यानंतर बेकायदा गुटखा विक्री विरोधात तीव्र कारवाई करण्यात येईल.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त