दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:17 IST2025-07-11T21:17:25+5:302025-07-11T21:17:58+5:30
पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या विशेष न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात सावरकरांचे वंशज सिद्ध करण्यासाठी दोन वंशावळी सादर केल्या आहेत. दोन्ही वंशावळ्यांची तुलना करता, पहिल्या (२०२३) वंशावळीत सात्यकी सावरकर यांच्या आई हिमानी अशोक सावरकर यांचे नाव स्पष्टपणे नमूद आहे. मात्र, दुसऱ्या (२०२५) च्या वंशावळीत हिमानी सावरकर यांचे नाव गायब आहे ही विसंगती लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर या मुद्द्यांवर खुलासा मागवणारा अर्ज बचाव पक्षातर्फे न्यायालयात दाखल केला आहे.
पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या विशेष न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. खटल्यादरम्यान सात्यकी सावरकर यांनी स्वत:ला सावरकरांचे वंशज सिद्ध करण्यासाठी सावरकर कुटुंबाची वंशावळी एप्रिल २०२३ मध्ये न्यायालयात सादर केली होती. मात्र, २५ एप्रिल २०२५ रोजी, राहुल गांधींचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मागणीनुसार, सात्यकी सावरकर यांनी दुसरी नवीन वंशावळी न्यायालयात सादर केली. मात्र दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? असा सवाल बचाव पक्षाने उपस्थित केला. या उपस्थित मुद्द्यांवर न्यायालयाने सावरकर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. पुढची सुनावणी येत्या २९ जुलै रोजी होणार आहे.
राहुल गांधी दोषी नाहीत
विशेष न्यायालयात शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील आरोप वाचून दाखवला. राहुल गांधी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांची बाजू मांडणारे ॲड. मिलिंद पवार यांनी “राहुल गांधी दोषी नाहीत” असा दावा न्यायालयात केला.