हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचारी वाऱ्यावर का ? राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:26 IST2025-07-11T16:26:15+5:302025-07-11T16:26:46+5:30
- हिंजवडीत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांमुळे सगळ्या कामांची भेळ झाली असून त्याचा त्रास आयटी कर्मचाऱ्यांसह मुळ नागरिकांनाही सहन करावा लागत आहे असे पक्षाने म्हटले आहे.

हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचारी वाऱ्यावर का ? राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
पुणे: खडकी तसेच पुणे कॅन्टोन्मेट यांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याला मान्यता दिली हा चांगला निर्णय सरकारने घेतला, मात्र हिंजवडी येथील किमान ३ लाख आयटी कर्मचाऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, त्यांना कोणीच वाली नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली.
हिंजवडीत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांमुळे सगळ्या कामांची भेळ झाली असून त्याचा त्रास आयटी कर्मचाऱ्यांसह मुळ नागरिकांनाही सहन करावा लागत आहे असे पक्षाने म्हटले आहे.
पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी सांगितले की खासदार झाल्यानंतर दिवंगत गिरीश बापट यांनी संसदेत पहिली मागणी कॅन्टोन्मेट परिसरातील नागरी भाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. त्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला. सरकारने आता त्यावर सकारात्मक निर्णय घेतला. मात्र हिंजवडी या आयटी पार्क मुळे नव्याने विकसीत झालेल्या परिसराबाबतही सरकारने चांगला निर्णय घ्यायला हवा होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीचा समावेश व्हायला हवा असे माने म्हणाले.
हिंजवडीत राजीव गांधी आयटी पार्क मध्ये किमान ३ लाख कर्मचारी काम करतात. त्याशिवाय तिथे अनेक उद्योग व्यवसाय विकसीत झाले आहेत. सध्या हिंजवडीमध्ये ग्रामपंचायत, एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका या सगळ्यांच्या कार्यक्षेत्रांची भेळ झाली आहे. मेट्रोच्या टाटा प्रोजेक्ट्स आणि सिमेन्सच्या स्वतंत्र यंत्रणेची त्यात भर पडली आहे. इतक्या यंत्रणा असूनही तिथे बसगाड्यांसाठी साधी पार्किंगची जागा नाही, सीसीटीव्ही यंत्रणाही नाही, रस्त्यांची चाळण झाली आहे, पर्यायी व्यवस्था नाही. मेट्रोचे काम सुरू आहे, पण त्यामुळे जमिनीवरच्या स्थितीत काहीच सुधारणा होणार नाही.
ही सर्व गैरव्यवस्था लक्षात घेऊन सरकारने तिथे एकच एक यंत्रणा विकसीत होईल, तिचा संपूर्ण परिसरावर ताबा राहिल, तेथील सर्व विकासकामे या यंत्रणेच्या माध्यमातून होतील असा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र कॅन्टोन्मेट संदर्भात सकारात्मकता दर्शवत सरकारने हिंजवडी परिसरातील लाखो कर्मचारी व नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे असे माने यांनी म्हटले आहे.