पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात "दादा" या एका शब्दावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेली जुगलबंदी कार्यक्रमाला रंगत आणून गेली. मात्र, 'दादा' म्हणून परिचित असलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची या जुगलबंदीत किंचित गोची झाल्याचे पाहायला मिळाले.या वादात आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री जर व्यासपीठावर ‘दादागिरी’ असे बोलत असतील, तर मग खऱ्या अर्थाने दादागिरी कोण करतंय हे त्यांनी स्पष्ट करावं. पुण्यात एमआयडीसीमध्ये कोणाची दादागिरी सुरू आहे? दादाच्या पक्षाची का भाजपची? की शिंदे गटाच्या नेत्यांची? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे कुठेही गेले की, महायुतीत सगळं 'ऑल इज वेल' नसल्याचं दिसतं. नेत्यांनी चिडण्यापेक्षा जनतेच्या त्रासाकडे लक्ष द्यावं. सध्या विकासदर खुंटला आहे, आणि प्रशासन गोंधळलेलं आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. राजकीय वर्तुळात ‘दादा’ शब्दावरून सुरू झालेल्या या जुगलबंदीने आता नवा वळण घेतला असून, महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.तत्पूर्वी, लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात सूत्रसंचालिकेने लोकमान्य टिळक यांनाही ‘दादा’ म्हणत असत अशी माहिती देत भाषणासाठी म्हणून अजित पवार यांना बोलावले. त्यांनी, ‘सूत्रसंचालिका पुण्याच्याच आहेत ना?’ असे म्हणत, ‘आमचे चंद्रकांत दादा काही अजून पुणेकर झालेले नाहीत,’ अशी मल्लीनाथी केली. त्यावर बसल्या जागेवरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘तुम्ही त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही, त्यामुळे तसे झाले’ असे सांगितले. पवार यांनीही त्यांना लगेचच, ‘मला पालकमंत्री करत असाल तरच तुमच्याकडे येतो, असे मी तुम्हाला सांगितले होते,’ असे प्रत्युत्तर दिले. माझ्या आधी चंद्रकांत‘दादा’च पालकमंत्री होते, याचीही आठवण त्यांनी करून दिली.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच ‘चंद्रकांत दादांना कोल्हापूरला पाठवणार आहात की काय?’ अशी केली. सभागृहात त्यामुळे हास्यकल्लोळ झाला. सच्चा आणि दिलदार नेता अशा शब्दांमध्ये गडकरी यांचा गौरव शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘दादा’ शब्दानेच केली. जे कधीही ‘दादागिरी’ करत नाहीत ते ‘दादा’ असे त्यांनी चंद्रकात पाटील यांच्याकडे पाहून म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्याचबरोबर, ‘काहींचे व्यक्तिमत्त्वच असे असते की, त्यांनी नुसते पाहिले तरी दादागिरी वाटते,’ अशी पुस्ती त्यांनी अजित पवार यांच्याकडे पाहून जोडली.
दादागिरी कोणाची? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा टोला, महायुतीत फूट असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:36 IST