खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोण मारणार बाजी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 12:40 IST2025-09-21T12:39:49+5:302025-09-21T12:40:40+5:30

- या जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कंबर कसणार असून, स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेत स्वतःची चाचपणी सुरू

pune news who will win the Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Khed taluka? | खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोण मारणार बाजी ?

खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोण मारणार बाजी ?

- भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, ग्रामीण भागात या निवडणुकीची जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. तालुक्यात एकूण ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण आहेत. या जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कंबर कसणार असून, स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेत स्वतःची चाचपणी सुरू आहे. वास्तविक, या निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील व आमदार बाबाजी काळे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गट व मनसे यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतांश जागांवर वर्चस्व राखले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे बाबाजी काळे विजयी झाल्याने उद्धवसेनेच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. तर भाजप आणि शिंदेसेनाही जोरदार तयारीने मैदानात आहेत. त्यातच प्रमुख पक्षांचे नेते कोणत्या ना कोणत्या कारणाने तालुक्यांमध्ये दौरे घेऊन पक्षाची ताकद तपासून घेत आहेत.

विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हे ‘विकासकामांचा’ मुद्दा घेऊन जास्तीत जास्त जागा हातात आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यासाठी ते आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवून नव्या चेहऱ्यांनाही संधी देतील, असे चित्र आहे. तर विद्यमान आमदार बाबाजी काळे हे विधानसभेप्रमाणे मोहितेंच्या विरोधकांची मूठ बांधून ठोस प्रत्युत्तर देत विजयश्री खेचून आणण्यासाठी कस लावतील. भाजप केंद्र सरकारच्या योजना आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वावर भर देत आहे. ‘मोदी लाट’ आणि ‘पारदर्शक प्रशासन’ हे मुद्दे घेऊन भाजप मतदारांपर्यंत पोहोचत आहे. स्थानिक शिंदेसेना नेते जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहेत. शेतकरी, कामगार आणि तरुणांचे प्रश्न घेऊन शिंदेसेना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढल्यास आणि इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास काहीजण अपक्ष लढण्याच्याही तयारीत आहेत.

रस्ते, वाहतूक कोंडी, बेरोजगारी प्रमुख मुद्दे...

या निवडणुकीत कोणताही मोठा विकास प्रकल्प नसला तरीसुद्धा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि तरुणांमधील बेरोजगारी हेच प्रमुख मुद्दे असणार आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या असून, काही भागात रस्त्यांची दुर्दशा आहे. तर तालुक्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या समस्यांवरून सर्वच पक्षांचे उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याच्या तयारीत आहेत.

स्थानिक समीकरणे आणि मतदारांचा कल...

खेड तालुक्यातील काही गावांमध्ये स्थानिक गट-तट निवडणुकीचे निकाल बदलू शकतात. मागील निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी केलेल्या कामांवरूनही मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. एकूणच यावेळी मतदार विकासावर आधारित निर्णय घेतील, असा कल दिसत आहे. कारण, निवडून देणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून मतदारांच्या खूप अपेक्षा आहेत.

 

Web Title: pune news who will win the Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Khed taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.