पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मानकर यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे.
माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पोलिसांना या व्यवहाराबाबत काही कागदपत्रे सादर केली होती. मानकर यांनी पोलिसांना सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली आहे. ही कागदपत्रे बनावट असल्याचं पोलिसांना आढळलं.
त्यानंतर दीपक मानकर यांच्याविरोधात समर्थ पोलिस चौकीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे मानकर यांनी नैतिकतेचा मुद्दा पुढे करून आपल्यामुळे पक्षाची बदनामी नको, असे स्पष्टीकरण देऊन राजीनामा दिला होता. त्यावर हा राजीनामा स्वीकारल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे विद्यमान कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी आमदार सुनील टिंगरे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, माजी महापौर दतात्रय धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नावाची शहराध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. येत्या चार दिवसात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचे नाव निश्चित होईल, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.