आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतच या दोन नेत्यांपैकी पुण्याचा वस्ताद कोण ठरणार?

By राजू हिंगे | Updated: July 22, 2025 15:38 IST2025-07-22T15:38:12+5:302025-07-22T15:38:33+5:30

- मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

pune news Who among these two leaders will be the leader of Pune in the upcoming Pune Municipal Corporation elections | आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतच या दोन नेत्यांपैकी पुण्याचा वस्ताद कोण ठरणार?

आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतच या दोन नेत्यांपैकी पुण्याचा वस्ताद कोण ठरणार?

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका महिन्यात किमान पाच ते सात वेळा फडणवीस हे पुण्यात येत आहेत. अजित पवार हे प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत बैठका घेऊन पाहणी करत आहेत. त्यामुळे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतच या दोन नेत्यांपैकी पुण्याचा वस्ताद कोण? हे ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्यातील नेते असल्यामुळे पुणे शहराकडे त्याचे सुरुवातीपासूनच लक्ष आहे. काँग्रेसचे माजी खासदार सुरेशभाई कलमाडी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवार यांनी २००७ साली पालिका निवडणुकीनंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना आणि भाजप यांना एकत्र घेऊन पुणे पॅटर्न तयार केला. दादा आणि भाई या संघर्षात निर्माण झालेल्या पुणे पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर पुण्यात अजित पवार जास्त लक्ष देऊ लागले. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे गेली कित्येक वर्षे आहे. अजित पवार हे कार्यकर्त्यांना अधिक ताकद देतात. अजित पवार यांचा कामाचा झपाटा अधिक आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे हे एकच आमदार आहेत. पुण्याच्या विविध प्रश्नावर अजित पवार सातत्याने बैठका घेत असून, विकासकामांची सकाळी लवकर पाहणी करतात.

पुणे महापालिकेत २०१७ साली भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतर २०२२ नंतर महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने सहा आमदार, पुणे लोकसभा खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, विधान परिषदेवर योगेश टिळेकर आहेत. केंद्रात सहकार राज्यमंत्री, राज्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पुणे शहरात आहे. त्यामुळे पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे. पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमापासून ते मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने येत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख ‘विकास पुरुष’ म्हणून झाली आहे. मेट्रो प्रकल्प, रिंग रोड, ई-बसेस, उड्डाणपूल, भामा आसखेडसारखा महत्त्वाचा पाणीपुरवठा प्रकल्प, तसेच समान पाणीपुरवठा योजना या त्यांच्या दूरदृष्टीच्या योजनांचे ठळक उदाहरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ससून रुग्णालयाचे विस्तारीकरण, नदी शुद्धीकरण व सुधारणा, तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोघांचेही पुणे शहरावर विशेष लक्ष असून, त्यांनी केलेल्या योजनांमुळे शहराचा चेहरामोहराच बदलला आहे. पुणे हे देशातील उत्कृष्ट शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि अजित पवार यांचे व्यवस्थापन कौशल्य निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यांचे नेतृत्व आणि विकासात्मक दृष्टिकोन हे पुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक ठरत आहे. - जगदीश मुळीक, माजी आमदार
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यावर विशेष लक्ष आहे. पुण्याचा विकासासाठी या दोन्ही नेत्यांचा रोल महत्त्वाचा आहे. अजित पवार यांची कर्मभूमी पुणे जिल्हा आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद आहे. पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी हे दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत. - धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप, पुणे 

उद्योग व्यवस्था आणि नागरीकरणाला सामावून घेण्याचा आवाका पुणे शहरात आहे. त्या प्रकारची दूरदृष्टी आणि विश्वास ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग ३० ते ३५ वर्षे निर्णायक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात विकासकामासाठी निधी दिला आहे. अजित पवार यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची साथ दिली. पुणे शहर दिवसागणिक नव्या ताकदीने, नव्या इच्छाशक्तीने उभे राहत, हे हेरूनच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. - रूपाली पाटील-ठोंबरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना पुणेकरांनी प्रचंड बळ दिले. मात्र, पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यात या दोन्ही नेत्यांना अजूनही वेळ मिळाला नाही. पुणे शहराची कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, वाढती गुन्हेगारी, महिलांची सुरक्षा, कोयता गँग, पावसाळ्यातही उद्भवणारी पाणीटंचाई अशा अनेक समस्यांनी पुणेकर ग्रस्त आहे. या समस्या दोन्ही नेत्यांनी सोडवाव्यात. - प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

Web Title: pune news Who among these two leaders will be the leader of Pune in the upcoming Pune Municipal Corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.