कात्रज तलावातील तीस हजार घनमीटर गाळ गेला कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:12 IST2025-12-13T19:11:34+5:302025-12-13T19:12:38+5:30
प्रत्यक्षात पाहायला गेले तर कात्रज उद्यानातील असलेल्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व गाळाचे साम्राज्य आहे.

कात्रज तलावातील तीस हजार घनमीटर गाळ गेला कुठे?
कात्रज : दक्षिण पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात २९ एकरमध्ये असणाऱ्या तलावात सांडपाणी मिसळत असून, यामुळे लेक टाऊन व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर आरोग्याला धोका निर्माण झाला असून, येथील नागरिक यामुळे आजारी पडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
प्रत्यक्षात पाहायला गेले तर कात्रज उद्यानातील असलेल्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व गाळाचे साम्राज्य आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी महानगरपालिकेकडून एनडीएमए प्रकल्पांतर्गत जलसंपदा विभागाला गाळ काढण्याची नियोजन देण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीदेखील ठरवण्यात आला. जलसंपदा विभागाकडून एप्रिल महिन्यामध्ये तीस हजार घनमीटर गाळ काढण्यात आला, असे सांगण्यात आले. एक लाख घनमीटरपैकी ३० हजार घनमीटर गाळ काढून तो तलावाच्या बाजूला टाकण्यात आला.
पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे काम थांबवण्यात आले. परंतु, अस्तित्त्वात पाहायला गेले तर सध्या या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व गाळाचे साम्राज्य असल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून लेकटाऊन व आजूबाजूच्या सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास होत असून, यावरती कायमस्वरूपी तोडगा काढला तरच हा प्रश्न मिटेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या तलावात कात्रज व आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मैलापाणी प्रक्रिया न होता येते. त्यामुळे ही समस्या उद्भवत असून, यावर तोडगा काढून गाळ पूर्णपणे काढून बाहेर टाकला, तरच हा प्रश्न मिटू शकतो, असे लेक टाऊनमधील नागरिकांचे म्हणणे आहे. गाळ काढण्यात आला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हा गाळ नेमका गेला कुठे? तसेच यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कात्रज तलावाची निर्मिती पेशव्यांनी पुण्याची तहान भागवण्यासाठी केली होती. सद्यपरिस्थितीत तलाव पाण्याचा तलाव नसून मैलापाणी साठवण असलेला तलाव झाला आहे. तीस हजार घनमीटर गाळ काढल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, वास्तविक गाळ काढून तो तलावाच्या अजूबाजूलाच साठवण्यात आला. तो गाळ पावसाळ्यात परत पाण्यासोबत तलवातच आला. हा गाळ नसून पाण्यात येणारा मैलाच आहे. हेच मुख्य कारण आहे की ड्रेनेजने येणारे मैला पाणी बंद करून संपूर्ण तलाव एकदा मोकळा केला पाहिजे, तरच दुर्गंधी कमी होईल. - लेकटाउन जागृत नागरिक संघ