गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:00 IST2025-07-30T09:59:54+5:302025-07-30T10:00:30+5:30
काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे.

गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले
तळेघर : आंबेगाव तालुक्यातील काळवाडी नंबर १ आणि नंबर २ (जांभोरी) ही गावे मृत्यूच्या छायेत वसली आहेत. गावाच्या वरच्या बाजूला राक्षसी रौद्ररूप धारण करणारा भयानक डोंगर, तर खालच्या बाजूला डिंभे धरणाचे विशाल पाणलोट क्षेत्र आणि गावाच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली मोठी भेग यामुळे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या गावांचे तातडीने पुनर्वसन व्हावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येत असून, दोन-तीन दिवसांत घरे कोसळण्याची भीती आहे. गावातील घरांमध्ये पाण्याचे उबड निघत असून, डोंगरावरील दगड खाली येत आहेत.
माळीण आणि इर्शाळवाडी यांसारख्या धोकादायक गावांप्रमाणेच काळवाडी गावाचे पुनर्वसन २०१४ पासून रखडले आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळवूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. “आमच्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? सरकारला आदिवासींची कधी कदर होणार?” असा सवाल ग्रामस्थ कोंडिबा पारधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
पुनर्वसनासाठी प्रयत्न
तात्पुरत्या उपाययोजनेसाठी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला असून, यातून काळवाडी नंबर १ आणि बेंढारवाडी या गावांनी जमीन खरेदी केली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांनी पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. काळवाडी नंबर १ साठी संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे, तर काळवाडी नंबर २ ची जागा खरेदी झाली आहे. मात्र, काही अडचणींमुळे पुनर्वसनाचा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही.
ग्रामस्थांचे म्हणणे
“रात्री डोळा लागत नाही. घरातून पाण्याचे उबड निघतात, वरचे दगड कधी खाली येतील याचा नेम नाही. सरकार लवकर आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवावे, नाहीतर आमची अवस्था माळीणसारखी होईल,” अशी भीती कोंडिबा पारधी यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी यांनी सांगितले की, “काळवाडी नंबर १ आणि बेंढारवाडी यांनी जमीन खरेदी केली असली, तरी पुनर्वसन रखडले आहे.”
तातडीने पुनर्वसनाची गरज
३० जुलै येताच ग्रामस्थांच्या अंगावर शहारे येतात. पावसाळ्यात रात्री झोप लागत नाही, अशी स्थिती आहे. चिमाजी पारधी, कावजी पारधी, सोमा लोहकर, नामदेव भोकटे, सुरेश भवारी, बबन पारधी, चंद्रकांत पारधी यांनी प्रशासनाला तत्काळ पुनर्वसनाची मागणी केली आहे.