पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) दैनंदिन १ हजार ८०० बसद्वारे प्रवासी सेवा देण्यात येते. अनेक बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच भरपावसात बसची वाट पाहात थांबावे लागते. पीएमपीने बीओटी तत्वावर नव्याने तीनशे बसथांब्याची आर्डर दिली असून, आणखी २०० थांबे बांधण्याचे ॲग्रीमेंट लवकरच होणार आहे. परंतु थांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीए हद्दीत प्रवासी सेवा आहे. दैनंदिन १० लाखांवर प्रवासी यातून प्रवास करतात. पीएमपीचे शहरात एकूण ४ हजार ९९२ बस थांबे आहेत. यापैकी केवळ १ हजार १०० बस थांब्यांवर प्रवासी शेड उभारण्यात आले असून, ३ हजार ९०२ थांब्यांवर प्रवाशांना रस्त्यावर उभे राहूनच बसची वाट पाहावी लागते.
मेट्रो सिटी म्हणून गाजावाजा करणाऱ्या पुण्यातील अनेक गजबजलेल्या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी शेड नसल्याने ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. शेड नसल्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शहरापेक्षा उपनगरांतील अवस्था गंभीर आहे. प्रवासी शेड नसल्यामुळे मुख्य रस्त्यावरच प्रवासी थांबतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्यावेळी गैरसोय होते.
नव्याने ५०० बसथांबे बांधणार
पीएमपी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बीओटी तत्त्वावर स्टेनलेस स्टीलचा बसथांबा बांधण्यात येत आहे. सध्या ३०० बसथांब्यांची ऑर्डर पूर्ण झाली आहे शिवाय अजून २०० बसथांबे बांधण्याचे ॲग्रीमेंट लवकर होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलास मिळणार आहे. परंतु एकूण बसथांबे आणि प्रवासी संख्या पाहता शेड असलेले बसथांबे वाढविण्याचे गरज आहे.
आकडे बाेलतात...
एकूण आगार - १७
एकूण मार्ग - ३८१
मार्गावरील बस - १ हजार ८००
दैनंदिन प्रवासी संख्या - १० लाख
शहरातील एकूण बसथांबे - ४ हजार ९००
शेड असलेले बसथांबे - १ हजार १००
पीएमपीच्या अनेक थांब्यांवर शेड नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हात, पावसाळ्यात भरपावसात बसची वाट पाहत थांबावी लागते. यामुळे प्रवाशांना गैरसोय होते. काही वेळा वेगात येणाऱ्या गाड्यांमुळे अघटित घटना घडली, तर जबाबदार कोण घेणार? सुरक्षित प्रवासासाठी शेड उभारणे आवश्यक आहे. -दयानंद पाटील, प्रवासी
पीएमपीकडून बीओटी तत्त्वावर ३०० बसथांबे बांधण्याचे ऑर्डर पूर्ण झाले आहे शिवाय आणखी २०० बसथांबा बांधण्याचे ॲग्रीमेंट लवकरच होणार आहे. भविष्यात आणखी बसथांबे उभारण्याचे काम सुरू होणार आहे. - दत्तात्रय झेंडे, चीप ट्रान्सस्पोर्ट, मॅनेजर, पीएमपी