पुणे : अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या बहुमतातील सरकार सत्तेवर आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या मागे पाशवी बहुमत आणि केंद्र सरकार असतानाही, भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्री हतबल आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होते, पण भ्रष्टाचारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले जात नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात शनिवारी वार्तालापप्रसंगी केली.ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणे उघडकीस आणली. अधिकाऱ्यांना अटक होते. पण ज्यांच्या खोलीमध्ये पैशांच्या बॅगा दिसतात, ज्यांचे डान्स बार आहेत, त्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही.आपल्या देशाला आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. कारण, ते देशाचे नव्हे तर एका पक्षाचे आहेत. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो, तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो. त्यांच्यापासून दूर गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडले. हे म्हणजे भाजपसोबत असल्यावर अमर प्रेम आणि त्यांना सोडल्यावर लव्ह जिहाद. आज चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार भाजपसोबत आहेत, मग ते हिंदुत्ववादी आहेत का, भाजपमधील मुस्लिम नेते हिंदुत्ववादी आहेत का, असा सवालही ठाकरे यांनी केला.अनेक वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. आम्ही रोज उठून एकत्र आहोत, हे सांगायची गरज नाही. निवडणूक आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. भरभरून देऊनही ज्यांनी गद्दारी केली, त्या नमक हरामांना मी उत्तर देत नाही. ज्यांनी पक्ष, निशाणी व बाप चोरला त्यांचे निवडणुकीतील मेरिट कसले तपासायचे? पुरामुळे उभे पीक वाहून गेल्यानंतर, जसा शेतकरी मेहनतीच्या बळावर पुन्हा उभा राहतो, तसा मीही पुन्हा पक्ष उभा करेन. मला केवळ माझा पक्ष बांधायचा नाही तर पक्षासोबत राज्य व देश बांधायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.ठाकरे म्हणाले, “ मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात न मागता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आता अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, तरीही त्याला मदत केली जात नाही. अद्यापही केंद्राचे पथक पाहणीसाठी राज्यात आले नाही. सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्यात रस आहे. सगळी शहरे बिल्डरांची माहेर घरे झाली आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहोचवली जात आहे.”
पुणेकरांनी मला माफ करावे; मी लक्ष देऊ शकलो नाही
मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मी पुण्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. त्यामुळे मला पुणेकरांनी माफ करावे. तेव्हा मी एकदा पुण्यात आलो होतो आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. पुणेकर म्हणत असतील तर पुढे मी पुण्यात नक्की लक्ष घालीन, असेही ठाकरे म्हणाले.
Web Summary : Uddhav Thackeray criticized the current Maharashtra government for corruption, despite its majority. He apologized to Pune residents for his inability to focus on the city during his tenure as Chief Minister, promising future attention.
Web Summary : उद्धव ठाकरे ने बहुमत के बावजूद महाराष्ट्र सरकार की भ्रष्टाचार के लिए आलोचना की। मुख्यमंत्री के रूप में अपने कार्यकाल के दौरान शहर पर ध्यान केंद्रित करने में असमर्थता के लिए पुणेवासियों से माफी मांगी, भविष्य में ध्यान देने का वादा किया।