पुणे :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून, काही पत्रकार आणि पोलिसांनाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. रविवारी (दि. १५) सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर सपकाळ यांच्या विधानाविरोधात सुमारे दीड तास आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक झाली. यात एका महिला व एका पुरुष कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला. दोन्ही पक्षांच्या लोकांकडून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. यात काही वाहनांचेदेखील नुकसान झाले.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगविली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ला केल्याचा आरोप करत काँग्रेसने फरासखाना पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा, अशी मागणी करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा...छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (५१, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढा काॅलनी, सदाशिव पेठ) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून आक्षेपार्ह वक्तव्य केले. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सपकाळ यांचे वक्तव्य तेढ निर्माण करणारे आहे, असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.यांचा आंदोलनात सहभाग..भाजपने रविवारी काँग्रेस कार्यालयामोर केलेल्या आंदोलनावेळी आमदार हेमंत रासने, महापौर मंजूषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेविका निवेदिता एकबोटे, कल्पना बहिरट, नगरसेवक देवेंद्र वडके, राजेंद्र काकडे, विशाल धनवडे, बापू मानकर, कुणाल टिळक यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर काँग्रेस भवनात काँग्रेसचे महापालिकेचे गटनेते चंदू कदम, कोषाध्यक्ष अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.दोन्ही पक्षांविरोधात परस्परविरोधी गुन्हे...दगडफेकीच्या घटनेनंतर काँग्रेसकडून फरासखाना पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजपकडूनदेखील दगडफेकीचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांसह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. अखेर याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. शहराच्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत दगडफेक झाली. त्यामुळे महापौरांसह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. - प्रशांत जगताप, काँग्रेस नेतेशहरात यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. या आंदोलनामुळे राजकारणातील मैत्रीपूर्ण संबंधदेखील दुरावले आहेत. यापूर्वी निवडणुकीतदेखील कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नव्हते. पण रविवारी झालेल्या आंदोलनामुळे शहरातील राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली. याचे परिणाम राज्यभर होतील. - अक्षय जैन, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेसआम्ही आंदोलनासाठी रीतसर परवानगी घेतली होती. आमच्या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी हे कटकारस्थान करण्यात आले. आमचे आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात तिथे जमले होते. आमच्याकडे असलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये काठ्या जमा करताना दिसत आहेत. आम्ही याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून, दगडफेकीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. - धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप
Web Title : BJP-Congress Clash in Pune Over Shivaji-Tipu Sultan Comparison
Web Summary : Pune witnessed clashes between BJP and Congress workers after controversial remarks comparing Shivaji Maharaj to Tipu Sultan. Stone pelting injured activists, journalists, and police. Both parties filed complaints, demanding arrests and investigations.
Web Title : शिवाजी-टीपू तुलना पर पुणे में भाजपा-कांग्रेस कार्यकर्ताओं में झड़प
Web Summary : शिवाजी महाराज की टीपू सुल्तान से तुलना पर पुणे में भाजपा और कांग्रेस कार्यकर्ताओं में झड़प हो गई। पथराव में कार्यकर्ताओं, पत्रकारों और पुलिस को चोटें आईं। दोनों दलों ने शिकायतें दर्ज कर गिरफ्तारियों और जांच की मांग की।