कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:55 IST2025-08-01T10:55:04+5:302025-08-01T10:55:18+5:30
कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?
पुणे : ‘‘हॅलाे, वसतिगृहाचा प्रश्न आहे. कुलसचिवांना फाेन करा. भाेजनगृहाची समस्या आहे, तरीही कुलसचिवांना फाेन करा. विभागातील प्रश्न आहे, कुलसचिवांनाच फाेन करा...’’ हे अनेकांचे ठरलेले उत्तर. कुलसचिवांचे मात्र ठरलेले... फाेन उचलायचाच नाही. याला माध्यम प्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. यात भरडला जाताेय विद्यार्थी अन् डागाळली जातेय विद्यापीठाची प्रतिमा. एक तर कुलसचिवांनीच संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिलेले की, माझ्याशिवाय माध्यमांशी काेणीही बाेलायचे नाही; अन् स्वत:ही बाेलायचे नाही. कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
जागतिक मानांकनात विद्यापीठाचा रँक वाढलेला असला तरी विद्यापीठातील समस्या सोडविण्यात ते कमी पडत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, बहुतांश विभागांमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश मिळालेले विद्यार्थी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून तातडीने विद्यापीठ गाठत आहेत. पण, वसतिगृह प्रवेश रखडल्याने राहायचं कुठे? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. वसतिगृहात किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला, किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती कोणीही देत नाही.
आम्ही दाद मागायची कुणाकडे?
गाव खेड्यातील, अतिशय दुर्गम भागातील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली मी सामान्य मुलगी. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर येताच अनेक वर्षांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण हाेत असल्याची भावना मनात हाेती. राहायला वसतिगृह मिळणार, या विचाराने मी सर्व साहित्य घेऊन आले हाेते. पण, वसतिगृह काही मिळत नाही अन् बाहेर राहणे परवडत नाही, अशी आमची व्यथा असल्याचे एका मुलीने सांगितले.
...ही तर लूट
विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची क्षमता साधारणत: १४०० काॅटची आहे. बहुतांश विभाग सुरू झाल्याने वसतिगृह प्रवेश तातडीने देण्याऐवजी ज्या मुली दिवसाला शंभर रुपये भरून राहू शकतील त्यांनाच राहण्याची व्यवस्था करायची, मग गरीब घरच्या मुलींनी काय करायचं? ग्रामीण आणि दुर्गम भागातून अतिशय कष्टाने पुण्यात आलेल्या मुला-मुलींनी काय करायचं? निवारा मिळेना, म्हणून सावित्रीच्या लेकीने शिक्षण साेडून गावी परत जायचं का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक मुलीला वसतिगृह देण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहायची साेय झाली नाही म्हणून शिक्षण साेडावे लागेल अशी वेळ कुणावर येणार नाही. फक्त काही प्रक्रिया पार पडण्यासाठी थाेडा वेळ लागत आहे. त्यातही तातडीने दुरुस्ती केली जाईल. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू