बेशिस्त रिक्षा, कॅबमुळे रेल्वे प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:43 IST2025-12-17T17:43:02+5:302025-12-17T17:43:16+5:30
- वाहतूक कोंडीमुळे रेल्वेस्थानकात पाेहोचण्यास अडचणी

बेशिस्त रिक्षा, कॅबमुळे रेल्वे प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत
पुणे : लांबचे भाडे मिळवण्यासाठी प्रवाशांच्या शोधात रेल्वेस्थानकांबाहेर रिक्षा, कॅबचालक तासन् तास गाड्या उभ्या करतात. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रिक्षा, कॅबचालकांवर ‘आरपीएफ’कडून कारवाई केली जाते. तरीही रिक्षा, कॅबचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे आरपीएफची रिक्षा, कॅबचालकांवर धाक नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, प्रवाशांना गर्दीतून वाट काढत रेल्वे पकडावी लागते. परिणामी, अनेकदा वेळेत पोहोचता न आल्याने अनेक प्रवाशांची नियोजित रेल्वे चुकत आहे.
मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वेस्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या ठिकाणावरून दररोज १६० रेल्वे गाड्या धावतात. तर पुण्यातून मेल, एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल मिळून ७२ गाड्या धावतात. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची दिवसरात्र गर्दी असते. प्रवाशांची लांबचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षा आणि कॅबचालक रेल्वेस्थानकावर येऊन बराच वेळ थांबतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाय स्थानकावर जागा कमी असल्यामुळे पुढे जाणाऱ्या वाहनांना रस्ता मिळत नाही.
त्यामुळे एक किलोमीटरपर्यंत लांब वाहनाच्या रांगा लागतात. अशा वेळी अनेक वेळा प्रवाशांची रेल्वे चुकत आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. आरपीएफकडून वारंवार कारवाई केली जाते; परंतु भाड्याच्या लालसेपाेटी रिक्षा, कॅबचालक जास्त वेळ थांबत आहेत. त्याचा थेट परिणाम इतर वाहनधारक आणि प्रवाशांवर होत आहे.
-------
कारवाईचा नुसता फार्स
रेल्वेस्थानक परिसरात उभ्या असलेल्या रिक्षा, कॅबचालकांवर आरपीएफकडून कारवाई करण्यात येते. शिवाय वाहतूक शिस्त लावण्यासाठी रांगेत गाड्या लावण्याची सोय केली आहे. तरीही रिक्षाचालक जागा मिळेल त्याठिकाणी रिक्षा उभी करत आहेत. यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे रिक्षा, कॅबचालकांना शिस्त कधी लागणार? शिवाय आरपीएफकडून केवळ कारवाईचा नुसता फार्स दाखविण्यात येतो का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
-------
अशी आहे आकडेवारी :
पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे : ७१
पुणे स्थानकातून धावणाऱ्या एकूण रेल्वे : १५३
मेल, एक्स्प्रेसची संख्या : १३५
दैनंदिन प्रवासी संख्या : १,७५,०००
-------
पुण्यातून दररोज दीड ते दोन लाख नागरिक प्रवास करतात. स्थानकाबाहेर रिक्षा, कॅबचालक प्रवासी घेण्यासाठी बराच वेळ थांबतात. त्यामुळे प्रवाशांना फलाटवर जाण्यासाठी रस्ता नसतो. अशा थांबलेल्या रिक्षा, कॅबवर आरपीएफकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शिवाय रिक्षा, कॅबला पाच ते दहा मिनिटे थांबण्यासाठी वेळ द्यावा. त्यामुळे त्यांना शिस्त लागेल आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ता मिळेल. - चैतन्य जोशी, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती
सायंकाळी सहा वाजता माझी रेल्वे होती. त्यासाठी जांभूळवाडी येथून दीड तास अगोदर निघालो. मालधक्का चाैकापासून रेल्वेस्थानकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शेवटी रेल्वे पकडण्यासाठी चालत निघालो. दरम्यान, रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड कोंडी होती. त्यामुळे फलाटवर वेळेत पोहोचू शकलो नाही. तोपर्यंत रेल्वे निघून गेली. - प्रसाद माळी, प्रवासी