गणेश विसर्जनासाठी गेलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:12 IST2025-09-09T11:12:14+5:302025-09-09T11:12:36+5:30
- आळंदी वडगाव रस्त्यावरील ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी गणेश विसर्जनासाठी साई गार्डन मंगल कार्यालयाजवळील तलावात गेले होते

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
आळंदी :आळंदी येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, सोमवारी (दि.८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आळंदी वडगाव रस्त्यावरील ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी गणेश विसर्जनासाठी साई गार्डन मंगल कार्यालयाजवळील तलावात गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पवन ज्ञानेश्वर येडे (वय १२) हा मुलगा तलावात बुडाला.
स्थानिकांनी तातडीने आळंदी पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अलंकापुरीआपत्कालीन संघाचे जीवरक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र प्रचंड चिखल व अंधारामुळे शोध कार्यात अडथळा येत होता.
यानंतर आळंदी पोलिसांनी पीडीआरएफ पथकाला पाचारण केले. जवानांनी आवश्यक साहित्याच्या मदतीने तलावात शोध सुरू केला. मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. पुढील तपासासाठी मृतदेह आळंदी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.