MPSC Exam: पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा? विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ; मतमाेजणीमुळे एमपीएससीने बदलल्या परीक्षेच्या तारखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:55 IST2025-12-10T11:55:23+5:302025-12-10T11:55:48+5:30
MPSC Exam 2025 Dates: राज्य निवडणूक आयोगाने दि. २ डिसेंबर रोजी आदेश काढत मतमोजणी दि. २१ डिसेंबर रोजी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

MPSC Exam: पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा? विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ; मतमाेजणीमुळे एमपीएससीने बदलल्या परीक्षेच्या तारखा
पुणे :महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय राज्य लाेकसेवा आयाेगाने घेतला आहे. यानुसार गट-ब पदाची परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२५ऐवजी ४ जानेवारी २०२६ राेजी हाेणार आहे. तसेच गट-क पदाची परीक्षा ११ जानेवारी २०२६ राेजी घेण्यात येईल, असे राज्य लाेकसेवा आयाेगाने स्पष्ट केले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब ' (अराजपत्रित) आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ४ जानेवारी २०२६ राेजी येत आहे. पूर्व नियाेजनानुसार नेट परीक्षा ३१ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०२६ पर्यंत विषयनिहाय पार पडेल. यात काही विद्यार्थ्यांचे नुकसान हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परीक्षा होणार की नाही, यावरून उलटसुलट चर्चा चालू होती. यावर आयोगाने काय ते स्पष्ट करावे, अशी भूमिका मांडण्यात आली. अखेर २१ डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने दि. २ डिसेंबर रोजी आदेश काढत मतमोजणी दि. २१ डिसेंबर रोजी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे राज्य लाेकसेवा आयाेगाची परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे दि. २१ डिसेंबर रोजी हाेत हाेती. यात काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणीचे ठिकाण यातील अंतर खूप कमी आहे, तसेच लाउडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, कर्मचाऱ्यांची कमतरता आदी बाबी विचारात घेऊन परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
आधीच परीक्षा वेळेवर होतं नाहीत, त्यातच वेळापत्रक जाहीर झाले की तारखा क्लॅश हाेतात, तर दोन - दोन परीक्षा एकत्र येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काेणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागते. - महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन