वडगाव काशिंबेग येथे तीन बिबट्यांचा थरार; शेतमजुराच्या सतर्कतेने वासरू बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:13 IST2025-07-24T17:13:09+5:302025-07-24T17:13:27+5:30
ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

वडगाव काशिंबेग येथे तीन बिबट्यांचा थरार; शेतमजुराच्या सतर्कतेने वासरू बचावले
मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील शेटेमळा परिसरात शेतकरी सुखदेव मार्तंड शेटे यांच्या घरासमोर बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला. यापैकी एका बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळच झोपलेल्या शेतमजुराच्या सतर्कतेमुळे वासरू थोडक्यात बचावले. हा सर्व थरार घराबाहेर आणि गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुखदेव शेटे यांच्या घरालगत शेती आणि गोठा आहे, जिथे पाच दुभत्या गाई आणि त्यांची वासरे बांधली जातात. सुरक्षेच्या दृष्टीने घराबाहेर आणि गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यापूर्वीही बिबट्याने गोठ्यातील एका वासराला ठार केले होते. बुधवारी पहाटे तीन बिबटे एकामागोमाग शेटे यांच्या अंगणात शिरले. त्यापैकी एकाने गोठ्यातील वासरावर झडप घेतली. वासराच्या हालचालीने आणि आवाजाने जागा झालेल्या शेतमजुराने पांघरूण फेकले आणि काठीने खाटेवर मारत आरडाओरड केली. यामुळे घाबरलेला बिबट्या पळून गेला. सुदैवाने मजुरावर हल्ला झाला नाही, परंतु तो बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होता.
या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, यापूर्वी अनेक पाळीव जनावरे ठार झाली आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वन विभागाने सांगितले, “वडगाव काशिंबेग येथे तीन बिबटे आढळल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही लवकरच पाहणी करून योग्य उपाययोजना करू.” तसेच, नागरिकांना रात्री उघड्यावर न झोपणे, घराभोवती प्रकाशाची व्यवस्था करणे आणि बिबट्याला चिडवू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.