इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग..! शहरात उदंड झाली जनसंपर्क कार्यालये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:19 IST2025-09-12T15:19:10+5:302025-09-12T15:19:38+5:30
- महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी; पाणी येतंय का?, मतदार नोंदणीत नाव आहे का?, चेंबर तुंबलंय का?, आधार काढायचे का? असे प्रश्न विचारत मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न

इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग..! शहरात उदंड झाली जनसंपर्क कार्यालये
- जमीर सय्यद
नेहरूनगर :पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने मतदारांशी संपर्क साधता यावा, त्यांच्यासमोर आपले नाव जावे यासाठी जनसंपर्क कार्यालय उघडण्याचा धडाका इच्छुक उमेदवारांनी सुरू केला आहे. पाणी येतंय का?, चेंबर तुंबलंय का?, मतदार नोंदणीत नाव आहे का? असे प्रश्न विचारत मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न करत आहेत.
महापालिका निवडणुकीत एका प्रभागात चार जागा असणार आहेत. निवडणुकीसाठी अनेक आजी-माजी नगरसेवक तसेच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी प्रभागांतील चौकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट व शरद पवार गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट व उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, मनसे
आदी राजकीय पक्षांची तसेच इच्छुक उमेदवारांची जनसंपर्क कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यावर फलके झळकत असून, इच्छुकांसाठी 'आपला माणूस', 'आपला जनसेवक', 'लोकसेवक', 'सक्षम उमेदवार', 'सुशिक्षित, अभ्यासू, सुसंस्कृत उमेदवार' अशा स्वयंघोषित पदव्या देण्यात आल्या आहेत. निवडणुकीमुळे चौकाचौकांत ही कार्यालये सुरू झाली आहेत.
थेट आता अवतरले
गेली पाच वर्षे मतदारांकडे पाठ फिरविणारे अनेक माजी नगरसेवक मतदारांना गोंजारण्यासाठी सक्रिय झाले आहेत. ते नागरिकांना 'पाणी येतंय का?', 'वीज आहे का?', 'चेंबर तुंबलंय का?', 'आधार कार्ड काढायचे आहे का?', 'मतदार यादीत नाव आहे का?' असे प्रश्न विचारत आहेत.
... पण पाच वर्षे कुठे गायब झाला होता?
इच्छुकांचा हा निवडणुकीपुरता डाव मतदारांच्या नजरेतून सुटलेला नाही. अनेक मतदार खासगीत चर्चा करताना 'पाच वर्षे कुठे गायब झाले होते?' असा उपरोधिक टोला लगावत आहेत.
बंद कार्यालये पुन्हा खुली
मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. तेव्हाही अनेक इच्छुकांनी शहर परिसरात जनसंपर्क कार्यालये सुरू केली होती. मात्र, निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी ती त्वरित बंद केली होती. आता पुन्हा एकदा निवडणूक आली असून, शहरातील सर्व प्रभागांची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे. त्यामुळे बंद असलेली जनसंपर्क कार्यालये पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. ही कार्यालये केवळ निवडणुकीपुरतीच असतात, हा नागरिकांचा अनुभव आहे.