Pune Ganpati Festival : यंदाचा गणेशोत्सव दहा नव्हे अकरा दिवसांचा; ब्रह्ममुहूर्त पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ वाजेपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:22 IST2025-08-27T11:20:53+5:302025-08-27T11:22:50+5:30
प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक

Pune Ganpati Festival : यंदाचा गणेशोत्सव दहा नव्हे अकरा दिवसांचा; ब्रह्ममुहूर्त पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ वाजेपर्यंत
पुणे : 'वक्रतुंड', 'एकदंत', 'कृष्णपिंगाश्च', 'गजवक्र', 'लंबोदर' अशा विविध अकरा विशेष नामांनी परिचित असलेल्या श्रीगणरायाचे आज (बुधवारी) आगमन होत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादी (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्ताची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकते. विशेष म्हणजे, यंदाचा गणेशोत्सव हा दहा नव्हे अकरा दिवसांचा असणार आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
ज्या गणेशाचे आवाहन आपण सुमुहूर्तमस्तु म्हणजे तू स्वताच एक सुमुहूर्त आहेस, असे म्हणून करतो. त्याच्या पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण तसेच राहूकाल, शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. प्रातः कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याचदिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही, तर दुकानातून गणपतीची मूर्ती ८ ते १० दिवस आधीसुद्धा आणून घरामध्ये ठेवता येते. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वितभर उंचीची आणि आसनस्थ असावी. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी म्हटले आहे.
प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक
पुढील वर्षी ज्येष्ठ अधिकमास असल्याने श्रीगणेशाचे आगमन उशिरा होईल. दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगणेश चतुर्थी असणार आहे. घरात गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. काही कुटुंबांत दीड दिवस, पाच व सात, तर काही घरांत अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धती आहे. पण, ती बरोबर नाही. घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. अशा वेळी विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून, पाण्यात विसर्जन करावे असे आहे, असेही दाते यांनी नमूद केले.