पुणे/मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालेल्या पुणे-लोणावळा उपनगरी रेल्वेसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर आता तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या उभारणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, तर मेट्रोच्या दोन स्थानकांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी (दि. १९) हे निर्णय घेण्यात आले. त्यात मुंबईसह राज्यातील अन्य पाच मोठ्या शहरांबाबतही निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेशकुमार, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक, तसेच विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणाऱ्या पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून, त्या परिसरातील औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला पाठबळ मिळणार आहे, तसेच शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे, तसेच पुणे मेट्रोच्या टप्पा एकमधील बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे.
आजच्या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री