पुणे : सरकारी पातळीवरूनच पारदर्शक आणि सक्रिय मोहीम राबवली जात नसल्याने शहरात गुटख्याचा व्यवहार आणि विवाद वाढला आहे. एकीकडे राज्यात गुटखाबंदी असल्याचे बोलले जात असले तरी राज्यात गुटखा बनवणाऱ्यांवर गेल्या अनेक वर्षांमध्ये कारवाई झालेली नाही. शहरात गुटखा विक्रीला अप्रत्यक्षपणे पोलिसांचेही पाठबळ असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. काही टपरीचालकांनी पोलिस आमच्याकडून पैसे नाहीत तर तंबाखूजन्य पदार्थ घेतात असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.शहरात मध्यरात्री दीडनंतर हॉटेल, पब, बार सुरू ठेवण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. शासकीय नियमानुसार दीडनंतर या आस्थापना सुरू ठेवता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र स्वारगेट, वाकडेवाडी, रेल्वे स्टेशन या परिसरासह कोरेगाव पार्क, पुणे-नगर रस्ता, नळ स्टॉप येथील चहा-नास्त्याची दुकाने सुरू असतात. या चहा-नास्त्याच्या दुकानांमध्ये, गाड्यांवर गुटखादेखील विकला जात असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होते. पोलिस विशेषतः रात्री गस्तीची वाहने अनेकदा या ठिकाणी उभी असलेली दिसतात. पानटपऱ्यांसमोर उभी असतात. टपरीचालकांकडून पोलिस पैसे घेत नसले तरी चिरीमिरी स्वरूपात गुटखा, सिगारेट, तंबाखू घेतात अशी माहिती पानटपरी चालकांनी दिली. काही ठिकाणी पैसे ही..रात्री अकरानंतर रस्त्यावर अंडाभुर्जी, राइसच्या गाड्यादेखील शहरात अनेक भागांमध्ये आहेत. तेथून कधी पार्सल, तर कधी ३०० ते ५०० रुपये घेऊन जात असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले. मुळात जर दीड वाजेपर्यंत हॉटेल, बार सुरू राहू शकतात तर या व्यावसायिकांसाठी वेगळा नियम का, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच, या हातगाडी व्यावसायिकांमुळे जर गर्दी अथवा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर त्या गाडीचालकावर कारवाई का केली जात नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो. या गाडाचालकांपैकी अनेकजण गुटख्याची विक्री करतात. त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने हे व्यावसायिकदेखील तक्रार करत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले. रेल्वेस्थानक परिसरात खुलेआम गुटखा विक्री..शहरातील पानटपरीचालक लपूनछपून गुटख्याची विक्री करतात. अथवा नियमित ग्राहकालाच गुटखा विकतात. रेल्वेस्थानक परिसरात मात्र, दररोज दिवसा आणि रात्री प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा ठेवून तो विकला जातो. हे दृश रेल्वे स्टेशन परिसरातून जाणाऱ्या प्रत्येकाला दिसते. मग पोलिसांना का दिसत नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होतो. पोलिसांची भूमिका महत्त्वाची..पोलिसांनी ठरवले तर एका दिवसात शहर सुतासारखे सरळ होऊ शकते. त्यासाठी केवळ चांगल्या मानसिकतेची गरज असते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून वारंवार सूचना देऊनदेखील जर ठोस कारवाई होत नसेल तर यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत पुणेकर व्यक्त करत आहेत.
आमच्याकडून हप्ता नाही, तर तंबाखूजन्य पदार्थ घेतात; त्यामुळे आम्हाला भीती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:00 IST