अनधिकृत फ्लेक्स लावल्यास होणार दहा ते पंधरा हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:16 IST2025-12-09T11:15:42+5:302025-12-09T11:16:17+5:30
-राजकीय फ्लेक्सवर प्रभावी कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

अनधिकृत फ्लेक्स लावल्यास होणार दहा ते पंधरा हजारांचा दंड
पुणे : शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला लगाम लावण्यासाठी प्रति फ्लेक्स एक हजार रुपये असणारा दंड वाढवला जाणार असून, प्रति फ्लेक्स १० ते १५ हजार रुपये करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली, तसेच फ्लेक्सवरील कारवाई तीव्र करण्याचे आणि राजकीय व्यक्तींच्या फ्लेक्सवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश आकाश चिन्ह व परवाना विभागाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांवरील विद्युत खांब, पथदिवे, सिग्नलचे खांब, चाैकांसह सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयाेजन, वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा यासाठी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स उभारले जातात. आकाश चिन्ह व परवाना विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून अशा अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाते. मात्र, राजकीय दबावामुळे प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच, शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी दिवाळीपूर्वी शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात सर्वत्र प्रभावीपणे कारवाई मोहीम राबवण्यात आली. अनधिकृत फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले. मात्र, यातून राजकीय फ्लेक्सकडे दुर्लक्ष केले गेले. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये केवळ खासगी कंपन्यांना लक्ष्य केले गेले. एकाही राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल केला नाही. दिवाळी सणामध्ये प्रशासनाने फ्लेक्सवरील कारवाई थांबवली होती. त्यानंतर ही कारवाई पुन्हा सुरू झाली नाही. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली जात आहे.
सध्या माजी नगरसेवक ठिकठिकाणी फ्लेक्स लावून विविध उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे त्या फ्लेक्सचा त्रास पादचारी मार्गाने जाणाऱ्यांना होत आहे. मध्येच फ्लेक्स लावला तर पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरून चालावे लागते. त्यामध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण होतो.
यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी आकाश चिन्ह व परवाना विभागाला शहरातील अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाई तीव्र करण्यासोबत राजकीय व्यक्तींच्या फ्लेक्सवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत फ्लेक्सचे प्रमाण वाढणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रतिफ्लेक्स १ हजार रुपये असणारा दंड १० ते १५ हजार रुपये प्रतिफ्लेक्स करण्यात येणार आहे, तसेच राजकीय व्यक्ती आहे, म्हणून त्याला सूट न देता त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जातील. - नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका