विधानपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:43 IST2025-09-16T13:42:30+5:302025-09-16T13:43:32+5:30
- पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ : भाजपकडून मतदारांची नोंदणी सुरू

विधानपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस होणार
पुणे : विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची वर्षभरानंतर निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाने त्यासाठीची मतदार नोंदणी सुरू केली असून त्यावर भाजप व राज्याच्या सत्तेतील त्यांच्याबरोबर महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात धुसफूस सुरू होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून ५ वर्षांपूर्वी निवडून आलेले अरुण लाड राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार यांच्याकडेच राहिले आहेत. तरीही अजित पवार गटाककडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे.
पुण्यासह सातारा सोलापूर, कोल्हापूर व सांगली अशा ५ जिल्ह्यांचा हा विधानपरिषदेचा मतदारसंघ आहे. दर ६ वर्षांनी निवडणूक होत असते. ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा तब्बल ४९ हजार मतांनी पराभव केला. साडेचार लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी या निवडणुकीत झाली होती. आता वर्ष शिल्लक राहिले असल्याने आतापासून या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भाजपने आघाडी घेतलेली दिसते आहे. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सक्रिय असलेले राजेश पांडे यांच्यावर या मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यांनीही जाहीर कार्यक्रम करत नोंदणीस सुरुवात केली आहे.
या निवडणुकीसाठीची मतदार नोंदणी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नव्याने करावी लागते. अशी नोंदणी केलेल्यांनाच मतदान करता येते. शिस्तबद्ध पद्धतीने मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी भाजप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर त्यांचाच वरचष्मा होता. आताचे भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याच मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्यानंतर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर विद्यमान आमदार लाड हे शरद पवार यांच्याबरोबरच राहिले असले तरी अजित पवार यांचा गटही या मतदारसंघावर दावा करत आहे. महायुती असतानाही भाजपने कसलीही चर्चा न करता, विश्वासात न घेता थेट मतदार नोंदणीस सुरुवात केल्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
पुणे जिल्ह्यावर अजित पवार यांचे वर्चस्व असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या या गटाकडून नेहमीच करण्यात येतो. त्यामुळेच सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी भाजपकडून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हट्टाने मागून घेतले. आता लवकरच जिल्हा परिषद, जिल्ह्यातील दोन्ही महापालिका तसेच नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुका, विशेषत: महापालिकेच्या निवडणुका युती न करता स्वबळावर लढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या संघटनात्मक शक्तीवर परिणाम करणारी ही मतदार नोंदणी भाजपला का करू द्यायची असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये आहे. त्यांच्याकडून या संदर्भात अजित पवार यांच्याकडे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ लढवण्याची मागणी करण्यात येणार आहे. विद्यमान अमदार अरुण लाड हे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सध्या तरी ते शरद पवार गटात आहेत, मात्र ऐनवेळी त्यात बदल होऊ शकतो. तसे झाले नाही तरी अजित पवार स्वतंत्र उमेदवार देऊ शकतात. भाजपकडून राजेश पांडे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जाते.