कारवाईची इच्छा नाही; पण कामे वेळेतच झाली पाहिजेत;जिल्हाधिकाऱ्यांकडून मंडल अधिकाऱ्यांना समज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 14:04 IST2025-09-06T14:01:27+5:302025-09-06T14:04:49+5:30
- सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार

कारवाईची इच्छा नाही; पण कामे वेळेतच झाली पाहिजेत;जिल्हाधिकाऱ्यांकडून मंडल अधिकाऱ्यांना समज
पुणे : जिल्ह्यात महसूल विभागाच्या मूळ कामकाजावर लक्ष केंद्रीय करण्यात आले असून, ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, सातबारा उतारे, महसुलाची वसुली यांसारख्या कामांचा आता दर पंधरवड्यात आढावा घेतला जाणार आहे. हे कामकाज मंडल अधिकारी करत असल्याने या कामावर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेच थेट लक्ष ठेवणार आहेत.
यासाठी या मंडल अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाचारण करून त्यांना कामकाजाचे धडे दिले. 'तुमच्यावर कारवाई करण्याची इच्छा नाही, पण ते वेळेत झाले पाहिजे,' असे सांगत कामकाज वेळेत करण्याची तंबी दिली. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येते. दरवेळी या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व तहसीलदार उपस्थित राहतात. यामध्ये सुरू असलेली कामे, नवीन उपाययोजना, रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आदींचा आढावा घेतला जातो.
मात्र, मंगळवारी (दि. २) पहिल्यांदाच मंडल अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलावण्यात आले. जिल्ह्यातील तब्बल १५४ मंडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी डुडी यांनी नागरिकांना विविध फेरफार वेळेत मिळाले पाहिजेत, पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजे, ई-फेरफार, ई-हक्क व ई-चावडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, सातबारा उतारे वेळेत दिले पाहिजेत, महसूल वाढवला पाहिजे, मागील सहा महिन्यांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर तयार करणे आणि सर्व अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देणे याबाबत सूचनाही दिल्या. त्यामुळे सामान्यांना सहज सुविधा मिळतील.
दप्तरात त्रुटी दिसल्यास थेट कारवाई होणार
सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार आहे. यामध्ये काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. "मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. अयोग्य काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल," असे डुडी यांनी सांगितले.